घटना पूर्वनियोजित; दहशत माजविण्याचा प्रयत्न : अमल महाडिक

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) एम.डीं.ना झालेली मारहाण ही पूर्वनियोजित होती. यापूर्वी त्यांना धमकी देण्यात आली होती. आपण खूप मोठे गुंड असल्याचे दाखवण्याचा व दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणुकीतील पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून येते. घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. आपण कार्यकर्त्यांना शांत राहण्याबाबत आवाहन केले आहे; परंतु त्याला योग्यवेळी जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणार्‍यांनी मारहाण केली असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 35 वर्षांत असे कधीही घडले नव्हते. सकाळी लोकशाही मार्गाने मोर्चा काढायचा आणि रात्री मारहाण करायची ही निंदनीय गोष्ट आहे. झालेल्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिलेली आहे. पोलिस प्रशासनावर आपला विर्श्वास आहे. त्यामुळे आपल्याला नक्की न्याय मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये सभासद अतिशय कमी होते; परंतु पक्षाच्या पदाधिकार्‍यांची संख्या मोठी होती. केवळ कारखान्याला बदनाम करण्याच्या हेतूने आणि राजकीय द्वेषापोटी विरोधकांकडून आरोप करण्यात येत असून, त्यामध्ये काही तथ्य नाही. ते ज्या साखर कारखान्याचे प्रतिनिधित्व करतात त्या डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या कारभाराबाबत कधी बोलत नाहीत, असेही ते म्हणाले.

कटामागे सतेज पाटीलच : खा. महाडिक

राजाराम कारखान्याच्या (sugar factory) एमडींना मारहाण करताना संदीप नेजदार जो गुंड त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्यांचा स्वतःचा 250 टन ऊस राजाराम कारखान्याला गेला आहे. त्यांनी येऊन तिथे मारहाण करणे म्हणजे हा सारा पूर्वनियोजितच कट असून याच्या मागे स्वतः सतेज पाटील आहेत, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. तसेच राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत आ.पाटील गटाचा दारुण पराभव झाल्याने सध्या ते वैफल्यग्रस्त आहेत. सत्ता नसली की ते विचित्र वागतात, असा टोलाही महाडिक यांनी लगावला. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

महाडिक म्हणाले, राजाराम कारखान्यामध्ये 21 विरुद्ध शून्य असा निकाल सभासदांनी दिला तेव्हापासूनच सभासदांनी केलेला अपमान पाटील यांच्या मनामध्ये कुठेतरी सलत असावा. हा हल्ला आकस्मिक नाही. हा पूर्वनियोजितच कट होता. ऊस वेळेत गेला नाही म्हणून एमडीला मारहाण हा महाराष्ट्रातल्या इतिहासातील काळा दिवस आहे. त्यामुळे मी राज्यातील सर्व साखर कारखानदार, सर्व संचालक, अधिकार्‍यांना, नॅशनल फेडरेशन शुगर, त्याचबरोबर साखर संघालाही आवाहन करतो. अशा गुंडांना चाप बसला पाहिज, त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. चिटणीस यांची मी रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांची तब्येत नाजूक आहे. त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्राव झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *