जयसिंगपूर : ‘त्या’ नकाशामुळे 10 गावांत खळबळ
गुरुवारी दुपारी चोकाक ते उदगावपर्यंतच्या नवीन होणार्या राष्ट्रीय महामार्गाचा (highway) नकाशा सोशल मीडियावर आल्याने शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील 10 गावांत एकच खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने हा नकाशा आधिकृत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून येत दोन दिवसांत याबाबत अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. या अधिसूचनेत ज्या गटातून महामार्ग जाणार आहे, तो गट नंबर प्रसिद्ध होणार आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम चोकाकपर्यंत गतीने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. आता चोकाक ते उदगाव-अंकलीपर्यंतच्या तयार केलेल्या मार्गाला जोडण्यात येणार आहे. याबाबत शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, मजले, हातकणंगले, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव या 10 गावांतून मार्ग जाणार आहे. मात्र या मार्गाचे निश्चितीकरण अद्याप राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
त्यामुळे 10 गावांतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. अशातच गुरुवारी दुपारपासून चोकाक ते उदगाव-अंकलीपर्यंतच्या महामार्गापर्यंत नवीन जोडणारा महामार्ग कुठून जाणार आहे याबाबात गुगल नकाशा दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे हा नकाशा खरा की खोटा याबाबत 10 गावांत संभ्रमावस्था असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबात प्राधिकरण विभागाकडून माहिती घेतली असता राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर म्हणाले, याबाबत प्राधिकरण विभागाकडून कोणताही नकाशा प्रसिद्ध करण्यात आला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात ज्या गटातून मार्ग जाणार आहे, ते गट नमूद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
असा आहे नकाशातील मार्ग
अंकली येथे तयार असलेल्या मार्गापासून (highway) सुरुवात होणार आहे. उदगाव येथे कृष्णा नदीवर पूल होणार असून उदगाव हद्दीतून पुढे उमळवाड ते हनुमाननगरपासून हॉटेल खासदार येथे जुन्या बायपास मार्गाला मिळणार आहे. त्यानंतर बायपास मार्गावरून पुढे जाऊन निमशिरगाव गावाला दानोळीकडील बाजूने गावाच्या बाहेरून येऊन पुन्हा बायपास मार्गाला व तमदलगे येथे पुन्हा तलावकडील बाजूने गावाबाहेरून खिंड येणार आहे. त्यानंतर मुख्य मार्गाला येऊन मजले हद्दीतून हातकणंगले बसस्थानक बाहेरून आळतेकडील बाजूने बाह्यवळण घेऊन पुन्हा आयटीआय येथे मुख्य मार्गाला जोडणार आहे. त्यानंतर तो मुख्य मार्गावरून चोकाकपर्यंत जोडण्यात येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींनी निश्चितीकरण सांगावे
शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील 10 गावांतून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. मात्र या महामार्गाचे निश्चितीकरण शेतकरी व ग्रामस्थांना माहितीच नसल्याने 10 गावांतील शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना लोकप्रतिनिधींनी मात्र या महामार्गाचे निश्चितीकरण सांगायला पुढाकार घेतला नाही. त्यामुळे 10 गावांतील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
तो नकाशा खरा असल्याचा दावा
प्राधिकरण विभागाने कोणताही नकाशा प्रसिद्ध केला नसल्याचे सांगितले असले तरी तो नकाशा खरा असल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. विभागाने मार्गाची निश्चिती सांगितली नव्हती. त्यामुळे हा नकाशा व्हायरल झाल्याने कोठून मार्ग जाणार, कोठे ओढ्यावरील पूल, नदीवरील पूल, जोड रस्त्यावरील सर्व उड्डाणपूल, भराव, गावांना बाह्यवळणे यासह सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे अधिसूचनेकडे लागून राहिले आहेत.