पाटगाव धरणातील पाणी ‘या’ प्रकल्पाला देणार नाही : हसन मुश्रीफ

पाटगाव धरणातील पाणी (water) अदानी समूहाच्या कोकणातील विद्युत प्रकल्पाला देण्याचे पडसाद सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. या प्रकल्पाला धरणातून पाणी न देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माणगाव खोर्‍यातील अंजिवडे गावात गौतम अदानी यांच्या अदानी कंपनीचा 2,100 मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून, प्रकल्प उभारण्याचे काम गुप्तपणे सुरू आहेे. 140 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले असून, त्यापैकी 70 हेक्टर क्षेत्रात जलसाठा करण्यात येणार आहे. यासाठी अंजिवडे गावाच्या माथ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातून टनेलसद़ृश पाईपलाईनद्वारे पाणी अंजिवडे येथे उभारल्या जाणार्‍या जलसाठ्यात सोडले जाणार होते.

या प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी (water) देण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर पाटगाव परिसरातील ग्रामस्थांनी धरणातून पाणी देण्याला विरोध सुरू केला. पाटगाव धरणातील शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी अदानी उद्योग समूहाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला देऊ नये, अशी मागणी करत पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत या धरणातील पाणी वीज प्रकल्पाला दिले जाणार नाही, अशी ग्वाही ना. मुश्रीफ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *