जिल्ह्यात आजपासून सुरू होणार ‘हे’ सर्वेक्षण
जिल्ह्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण (Survey) मंगळवार, दि. 23 पासून केले जाणार आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने दिलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी सुरू होणार आहे. मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना तब्बल 180 प्रश्नांची विचारणा करत माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षण करणारा प्रगणक मोबाईलवरच ही माहिती घेणार असून ती आपोआप संकलित होणार आहे. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेसह जिल्ह्यातील सर्वेक्षणासाठी एकूण सात हजार 862 प्रगणकांची नियुक्ती केली जाणार आहे.
या सर्वेक्षणात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना तब्बल 180 प्रश्नांची विचारणा केली जाणार आहे. यामध्ये कुटूंबाची माहिती, त्यांच्या व्यवसाय, शेती, नोकरी आदी प्रश्नांद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे. कुटूंब खुल्या प्रवर्गातील अथवा मराठा प्रवर्गातील नसेल तर त्याला पुढील प्रश्न विचारले जाणार नाहीत. मात्र, हे सर्वेक्षण घर ते घर होणार असल्याने प्रत्येक प्रगणक, प्रत्येक घराला भेट देणार आहे. या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटने मोबाईल अॅप विकसित केले आहे.
सर्वेक्षण कसे करायच याबाबतचे प्रगणकांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण दिलेले मास्टर ट्रेनर सर्वेक्षण (Survey) पूर्ण होईपर्यंत त्या त्या परिसरात थांबून नागरिकांनी आपली माहिती भेट देणार्या कर्मचार्यास द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.