सर्वेक्षणात पहिल्या दिवशी ‘अॅप’चा खोडा
जिल्ह्यात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला (survey) मंगळवारी प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी सर्वेक्षणात ‘अॅप’चा अडथळा आला. अनेक प्रगणकांचे ‘अॅप’ डाऊनलोड झालेच नाही, यामुळे काही भागांत सर्वेक्षण झाले नाही. ही प्रक्रिया बुधवारपासून सुरळीत होईल, अशी शक्यता आहे.
जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी एकूण 6 हजार 44, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात 1 हजार 350, तर इचलकरंजी महापालिका क्षेत्रात 468 प्रगणकांची नियुक्ती केली आहे. या प्रगणकांकडून मंगळवारी सकाळी सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मात्र, याकरिता आवश्यक ‘अॅप’ मोबाईलवर डाऊनलोडच झाले नाही. ज्यांचे ‘अॅप’ डाऊनलोड झाले, त्यांनी सर्वेक्षण सुरू केले. मात्र, सर्व माहिती भरून झाल्यानंतर ती सबमिट करताना काहींना तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे दिवसभर जिल्ह्याच्या अनेक भागांत गोंधळाचे वातावरण होते.
मोबाईल अॅप सुरू न झाल्याने काही प्रगणक सर्वेक्षणाच्या (survey) ठिकाणी दुपारपर्यंत थांबून होते. मात्र, अनेक प्रगणकांचे सर्वेक्षणाचे काम सकाळपासूनच सुरू झाले. दिवसभरात अनेक ठिकाणी सर्वेक्षण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.
वेळेत सर्वेक्षण होणार का?
या सर्वेक्षणादरम्यान मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना तब्बल 180 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याची ‘होय’ अथवा ‘नाही’ या स्वरूपात माहिती घेतली जाणार असली, तरी ती भरण्यासाठी लागणारा कालावधी याचा विचार केला, तर दिवसभरात आठ-दहा कुटुंबांच्या माहितीचे संकलन होईल, अशी स्थिती आहे. या सर्वेक्षणासाठी एकच दिवसापूर्वी प्रशिक्षण दिले आणि दुसर्या दिवशी सर्वेक्षणाला पाठवले, यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यातच अॅप डाऊनलोड न होणे, माहिती सबमिट न होणे, अशा अडचणींनी दहा दिवसांत हे सर्वेक्षण होणार का, असा सवाल आता नागरिकांतून केला जात आहे.