कोल्हापूर : कळंबा परिसरात गुंडांचा रात्रभर धिंगाणा
(crime news) जुना राजवाडा आणि करवीर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या एका सराईत फाळकूट टोळीच्या गुंडांनी कळंबा परिसरासह रिंग रोडवर सोमवारी मध्यरात्री अक्षरश: धिंगाणा घालून दहशत माजविली. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. तरुणांचा पाठलाग करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली. सुमारे दोन-अडीच तास टोळीचा नंगानाच सुरू होता.
अलीकडच्या काळात कळंबा परिसरात गुंडांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. करवीर व जुना राजवाडा पोलिसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे सराईत टोळ्यांच्या उचापती वाढू लागल्या आहेत. सराईतांच्या वाढत्या कारनाम्यामुळे परिसरातील छोटे छोटे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
गुंड टोळीतील पाच ते सहाजणांच्या टोळक्याने रविवारी रात्री उशिरा कळंबा येथील साई मंदिर व रिंग रोड परिसरात धुमाकूळ घातला. काठ्या व लोखंडी सळ्या घेऊन दुचाकीवरून आलेल्या सराईतांनी रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. प्रतिकाराचा प्रयत्न करणार्यांचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. शिवीगाळसह जोरजोरात आरडाओरड सुरू होती. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू होता. (crime news)
नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस आले आणि थोड्याच वेळात पुन्हा माघारी फिरताच गुंडांनी पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केल्याने अधिकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दुचाकीवरून आलेल्या तरुणाला टोळक्याने रस्त्यावर रोखून मारहाण केली.
शहर, उपनगरासह ग्रामीण भागातील काही नामचीन टोळ्यांमधील सराईत गुंड तसेच तडीपारी झालेल्या संशयिताची शहरात रात्री उशिरा वर्दळ दिसून येत आहे. मध्यवर्ती चौक व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यास त्याचा भांडाफोड होईल, अशी नागरिकांत चर्चा आहे.