कोल्हापूरची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू
स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्या कोल्हापूरला प्रदूषणाचे (pollution) ग्रहण लागले आहे. शहरातील हवेत सर्वात घातक समजल्या जाणार्या अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम 2.5 व पीएम 10) प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे कोल्हापूरकरांचे आयुर्मान सरासरी 2 वर्षे 6 महिन्यांनी घटल्याचा धक्कादायक निष्कर्ष शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण 2 वर्षे चार महिने होते. त्यामध्ये दोन महिन्यांची वाढ झाली आहे.
या अहवालानुसार शहरामधील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर 2.5) 36.9 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानकापेक्षा तब्बल तीनपट जास्त आहे. हे वायू प्रदूषण (pollution) जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानकापर्यंत आल्यास नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होईल, असे अहवालात आवर्जून नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या एका अहवालानुसार महाद्वार रोड परिसरामध्ये अनेकदा पीएम 2.5 ची पातळी 40 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरच्या वर नोंद केली गेली आहे. वाढत्या पीएम 2.5 च्या प्रमाणाचा परिणाम केवळ श्वसन संस्थेवरच नाही, तर मेंदू आणि प्रमुख अवयवांवरही होत असल्याचे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
दाभोळकर कॉर्नर परिसरामध्ये श्वसनीय धूलिकणांचे (रेस्पिरेबल पार्टिक्युलेट मॅटर) व अतिसूक्ष्म धूलिकणांनी (सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर) धोक्याची पातळी ओलांडली आहे. डिसेंबर 2021 मध्ये येथे श्वसनीय धूलिकणांचे सर्वाधिक प्रमाण 147 व धूलिकणांचे प्रमाण 302 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर इतके होते. सध्या येथील वायू गुणवत्ता निर्देशांक 120 ते 131 च्या दरम्यान असल्याने येथे जास्त काळ वावरल्यास फुफ्फुस तसेच हृदयविकाराने त्रस्त नागरिकांना व लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.
शहराच्या वायू गुणवत्ता निर्देशांकाची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. दाभोळकर कॉर्नर परिसरामधील सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षभरात एकदाही उत्तम हवेची नोंद झालेली नाही. येथील वायू गुणवत्ता निर्देशांक एकदाही 50 च्या खाली आल्याची नोंद नाही. ऑक्सिजन झोन समजल्या जाणार्या शिवाजी विद्यापीठ परिसरात वर्षभरात केवळ 27 वेळा हवा उत्तम होती, असा निष्कर्ष आहे.