पन्हाळ्यावर शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारक उभारणार
पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह त्यांचा पूर्णाकृती पुतळा (statue) लवकरच उभारणार, अशी घोषणा पालकमंत्री (Guardian Minister) हसन मुश्रीफ यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पन्हाळगडावर केली. शिवाजी महाराज यांचा इतिहास भावी पिढीसाठी प्रेरणादायी व्हावा यासाठीच हा अट्टाहास असल्याचेही त्यांनी सांगितले.
पन्हाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज सप्ताहांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते.
मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या दोन्हीही राजांनी प्रसंगी आपल्या खजिन्यातून जनतेचे हित जोपासले.त्यामुळे शिवाजी महाराज यांची 350 वर्षांनंतर तर शाहू महाराज यांची 150 वर्षांनंतरही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो. त्यांचा जयजयकार करतो. हेच रयतेचे कल्याणकारी स्वराज्य यावे, अशीच जनतेची मनोमनी अपेक्षा असाव्यात.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, मधुकर जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसनराव चौगुले, अमरसिंह माने-पाटील, बाबासाहेब देशमुख, आसिफ फरास, संभाजीराव पाटील, अमित गाताडे, आसिफ मोकाशी, शिरीष देसाई, शिवाजी देसाई, प्रकाश पाटील-टाकवडेकर आदी उपस्थित होते.
इतिहासाला उजाळा…
पालकमंत्री (Guardian Minister) मुश्रीफ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजनीती, युद्धनीती, स्वभावगुण यांसह अनेक ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला तर अनेक वक्त्यांनीही आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशीद, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर यांच्याही इतिहासाला उजाळा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलले होते.