धनंजय महाडिकांच्या लेकाची राजकारणात एन्ट्री?
युथ आयकॉन म्हणून महाराष्ट्राला परिचित झालेले कृष्णराज धनंजय महाडिक आता राजकारणाच्या (politics) मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर शहराच्या रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी आणल्याचे बॅनर झळकून त्यांनी त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी कोल्हापूर उत्तर, दक्षिण की कोल्हापूर लोकसभा याची चर्चा वेगावली आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे रेसिंग या क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे जागतिक पातळीवर चमकले. त्यानंतर युट्युबवर ‘महाडिक पॅटर्न’ या अतिशय गाजलेल्या ब्लॉगमुळे महाराष्ट्रात परिचित झाले. राज्यभर त्यांचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न समाज सेवेसाठी खर्च करण्याचा त्यांचा निर्णय कौतुकास्पद ठरला.
या सर्व पार्श्वभूमीवर फुटबॉल स्पर्धा घेऊन त्यांनी कोल्हापुरात बॅनर झळकवले. त्या पाठोपाठ रविवारी दिवसभरात कोल्हापूरच्या चौकाचौकात शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी आणल्याचे त्यांचे फलक लागले. फलकावर कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नाने हा निधी आणल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यातून त्यांनी आपण राजकारणात (politics) येणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू असून खासदार संजय मंडलिक यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये खुद्द धनंजय महाडिक यांच्यासह राजेश क्षीरसागर, शौमिका महाडिक, समरजीत घाटगे यांची नावं आहेत. अशातच कृष्णराज महाडिक यांनी अचानक बॅनरबाजी केल्यामुळे ते दक्षिण, उत्तर की लोकसभा लढणार याची चर्चा सुरू झाली आहे.
राजकारणात येणार याचे संकेत त्यांनी गेल्या आठवड्यातच दिले होते. त्यानुसार त्यांनी आज बॅनरबाजी केल्यामुळे आणि लोकसभेच्या धामधुमीत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.