राजकीय अपघात टाळण्यासाठी मी सिग्नल दर्शकाच्या भूमिकेत : संजय मंडलिक

कोल्हापूरमधील रेल्वे सुरळीत व्हावी, यासाठी मी अधिकाऱ्यांना सातत्याने सूचना करत असतो. सध्या जिल्ह्यात राजकीय समझोता एक्सप्रेसची चर्चा सुरु आहे. मात्र, या समझोता एक्सप्रेसचा कोठे अपघात होऊ नये, यासाठीही मी सिग्नल दर्शकाच्या भूमिकेत आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केले. ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अ‍ॅड. सुरेशराव कुराडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंडलिक यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने राजकीय चर्चेला चांगलाच जोर आला आहे.
ऐनापूर येथील विविध संस्थांतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यानिमित्ताने मंडलिक व घाटगे एकाच व्यासपीठावर आले. या वेळी मंडलिक यांनी समरजितसिंह घाटगे यांना तुमचे वय किती?, अशी विचारणा केली. घाटगे यांनी उत्तर देताच मंडलिक यांनी तुमचे वय शारीरिकदृष्ट्या कमी असले, तरी सध्याच्या तुमचा राजकीय, सामजिक क्षेत्रातील अनुभव हा ५० वर्षांहून मोठा असल्याचे जाणवते, असे सांगत कौतुक केले.
खासदार मंडलिक हे आज जिल्ह्यात निधीचे वाटप करत आहेत. ऐनापूरसह परिसरातील गावे कागल मतदारसंघात येतात. २०२४ मध्ये या भागाला निधी देण्याचे भाग्य मला मिळू देण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्वांची आहे, असे विधान व्यासपीठावरील अ‍ॅड. कुराडे, खा. मंडलिक यांच्याकडे कटाक्ष टाकत घाटगे यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात कागलातील दोन वाघ पहिल्यांदाच एकत्र आल्याचा उल्लेख करीत ‘समझनेवालों को इशारा काफी हे’ असाच संदेश यातून जात असल्याचे अ‍ॅड. सुरेशराव कुराडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *