कोल्हापूर : नागरिकांतून तीव्र नाराजी

महसूल, पोलिस खात्यांपाठोपाठ आता महावितरण कंपनीही लाचखोरीत अग्रेसर ठरत आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल 10 वीज कर्मचारी, अभियंते लाच घेताना सापडल्याने महावितरणला लाचखोरीची (Bribery) लागण लागल्याचे सिद्ध होत आहे. अगदी वर्ग-4 पासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत या कारवाईत सापडले आहेत. सध्या महावितरणचे अस्तित्व धोक्यात आले असतानाही अभियंते, कर्मचारी यांच्या मनोवृत्तीत फरक पडत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यादीत पूर्वी महसूल व पोलिस खात्यांचा बोलबाला होत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांत या दोन खात्यांबरोबरच महावितरणचे अभियंते, कर्मचारीही स्पर्धा करू लागल्याचे चित्र आहे. भार मंजूर करून घेणे, ठेकेदारांचे देयक मंजूर करणे, नवीन विद्युत कनेक्शन देणे या आणि अशा विविध कामांसाठी नागरिकांसह ठेकेदारांना अभियंते, अधिकारी यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात.

महावितरण मध्ये सर्वच अभियंते, अधिकारी वाईट प्रवृत्तीचे आहेत असे नाही अनेकजण ग्राहकांची प्रामाणिकपणेसेवा बजावत आहेत. मात्र, मूठभर वाईट प्रवृत्तीमुळे संपूर्ण कंपनी बदनाम होण्याची वेळ आली आहे. शंभर आरोपी सुटले तरी चालतील, मात्र एखाद्या निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, असा दंडक आहे. मात्र, याचा गैरफायदा घेण्याचे काम महावितरणमधील काही मंडळी करीत आहेत.

एखादा कर्मचारी, अभियंता लाचखोरीत सापडल्यास त्याचे निलंबन होते. मात्र, काही काळानंतर त्याला कामावर घेऊन अगदी पदोन्‍नतीही दिली जाते. यापूर्वीच्या कारवाईतील अनेकांना सेवेत रुजू करून घेतले आहे. एवढेच नाही तर काहींची पदोन्‍नतीही झाल्याचे चित्र आहे.

प्रशासनाच्या या धोरणामुळे लाचखोर (Bribery) अभियंते, कर्मचार्‍यांचे मनोबल वाढते. काय होतंय, अशी भावना होऊन असे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे. अधिकार्‍यांबाबत तक्रारी, गुन्हे दाखल होऊनही अनेकजण सेवेत कायम आहेत, तर काही उच्चपदस्थ म्हणून कंपनीत रुबाबात कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *