जिल्ह्यातील 40 टक्के फौंड्री बंद

कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती व फौंड्री उत्पादनाला पुरवठादारांकडून वाढीव दर मिळत नसल्याने कोल्हापुरातील फौंड्री उद्योग संकटात आला आहे. पिग आयर्नच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून दोन वर्षांपूर्वी असणार्‍या दरात दुपटीने वाढ झाली आहे. रोजच्या दरवाढीने फौंड्री उद्योजक वैतागले असून तोट्यात उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा बंद केलेले बरे या मानसिकतेमुळे जिल्ह्यातील 40 टक्के फौंड्री उद्योग (foundry industry) बंद केले आहेत.

वाहन उद्योगाला लागणारे स्पेअर पार्टस् तयार करणारी कोल्हापूर ही मोठी फौंड्री इंडस्ट्री आहे. फौंड्रीमधून तयार होणार्‍या मालावर मशिन शॉपमध्ये प्रक्रिया केली जाते. नंतर हा माल मोठ्या वाहन निर्मिती करणार्‍या कंपन्यांना पाठवला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 400 पेक्षा अधिक लघु व मध्यम फौंड्री उद्योग आहेत. या उद्योगामार्फत दररोज 75 हजार टन कास्टिंग केले जाते. फौंड्री उद्योगाला लागणारा कच्चा माल म्हणजे पिग आयर्न, स्क्रॅप, आयर्न ओव्हर. फौंड्रीसाठी पिग आयर्न हा महत्त्वाचा घटक आहे. पण सध्या याचेच दर गगनाला भिडले आहेत. दोन वर्षांत पिग आयर्नच्या किमतीत दुपटीनेवाढ झाली आहे.

फौंड्री उत्पादकांकडून किती दराने माल घ्यायचा याचा करार मोठ्या कंपन्या अगोदरच करत असतात. काही कंपन्या कच्च्या मालात वाढ झाली तर वाढीव दराने माल खरेदी करण्याची जबाबदारी घेतात; तर काही कंपन्या तशी हमी देतीलच असे नाही.

2019 साली पिग आयर्नचा दर 10 टनाला 30 हजार 475 इतका होता. सर्व कर व वाहतूक खर्चाचा विचार करता हा दर 3 लाख 71 हजार 700 रुपये इतका होता. आज हाच दर 7 लाख 9 हजार 200 रुपयांच्या आसपास गेला आहे. तयार मालाची किंमत किलोला 90 रुपये झाली आहे. तीच पूर्वी 60 ते 65 रुपये होती. मोठ्या कंपन्या या जुन्या दरानेच मालाची खरेदी करतात. पण फौंड्री उद्योगाला या उत्पादनासाठी येणारा खर्च ध्यानात घेऊन किलोला किमान 90 रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा असते. या वाढीव दराने कंपन्या मालाची खरेदी करत नसल्याने अनेक फौंड्री उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत.

रोज दर बदलतात

यापूर्वी सहा महिन्यांनी फौंड्री उद्योगाला (foundry industry) आवश्यक असणार्‍या मालाचे दर बदलत होते. पण आता दररोज हे दर बदलत आहेत. ज्या दिवशी ज्या दराने माल खरेदीचा निर्णय घेतला, तो तत्काळ न घेतल्यास दुसर्‍या दिवशी या दरात वाढ होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे फौंड्री उद्योगाला लागणार्‍या कच्च्या मालाचे दर किमान सहा महिने स्थिर ठेवावेत, अशी मागणी फौंड्री उद्योजक हिंदूराव कामटे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *