कोल्हापूर : शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

नेट-सेट किंवा पीएच.डी. नसताना झालेल्या शारीरिक शिक्षण संचालकांच्या नियुक्त्या व विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीवरून अधिसभेत आज वादळी चर्चा झाली. प्रा. प्रताप पाटील यांनी शारीरिक शिक्षण (Physical education) संचालकांच्या नियुक्त्यांत शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. प्रा. मधुकर पाटील यांनी हे प्रकरण गंभीर असल्याची पुष्टी जोडली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अधिसभेच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रश्‍नोत्तराच्या तासात प्रा. पाटील यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांकडून सर्व गोपनीय अहवाल मिळाले आहेत का, असा प्रश्‍न केला. त्यावर ॲड. धैर्यशील पाटील यांनी होय, असे उत्तर दिल्यानंतर अमरसिंह रजपूत यांनी त्या पदावरील व्यक्तींनी पदांसाठी पुन्हा अर्ज केले आहेत का, तर प्रताप माने यांनी त्यांना निवृत्तीनंतरचे फायदे मिळाले का, अशी विचारणा केली.

डॉ. नीळकंठ खंदारे यांनी सर्वांचीच गोपनीय माहिती द्यावी, अशी मागणी केली. प्रा. पाटील यांनी संलग्नित महाविद्यालयांत नेट-सेट किंवा पीएच.डी. नसताना शारीरिक शिक्षण संचालक म्हणून मान्यता दिली आहे का, असा प्रश्‍न केला. त्यावर अॅड. पाटील यांनी ४४ जणांना मान्यता दिल्याचे सांगितले. प्रा. प्रताप पाटील यांनी विद्यापीठ अनुदानाचे आयोगाचे निकष डावलून निवड करणे, ही विद्यापीठाची चूक असल्याचे सांगितले. निवड करण्याचा निर्णय विद्यापीठाची दहा जणांची समिती घेते. संस्था केवळ निवड झालेल्या व्यक्तीला नियुक्ती पत्र देते, असेही ते म्हणाले. त्यावर मधुकर पाटील यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. प्रा. मनोज गुजर यांनी शारीरिक शिक्षण (Physical education) संचालक पदासाठी शैक्षणिक अर्हता काय, असा उप प्रश्‍न केला. श्री. माने यांनी शारीरिक शिक्षण देणारी महाविद्यालये बंद होत आहेत. मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्याबाबत विद्यापीठ काय करणार, असा सवाल केला. त्यावर पदव्युत्तर विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे अॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी कशी ठरवली जाते, नियमावली करण्याचे अधिकार आहेत का, असा प्रश्‍न प्रा. खंदारे यांनी विचारला. डॉ. एस. डी. डेळेकर यांनी यादी करण्यासाठी दिरंगाई का, अशी विचारणा केली. प्राचार्य व्ही. एम. पाटील, रजपूत यांनीही प्रश्‍न विचारले. कॅसनुसार स्थान निश्‍चितीसाठी सर्व पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला असतानाही विद्यापीठाने स्थान निश्‍चितीसाठी केलेल्या यादीत किती शिक्षकांची नावे समाविष्ट झालेली नाहीत, हा खंदारे यांचा प्रश्‍न संदिग्ध असल्याचे सांगण्यात आले.

कुलसचिव पदाची प्रक्रिया सुरू

कुलसचिव पदावर नियमित नियुक्ती करण्यात अडचण आहे का, असा प्रश्‍न डॉ. खंदारे यांनी विचारला. त्यावर भरती प्रक्रिया सुरू असल्याचा खुलासा विद्यापीठातर्फे करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *