भाजपला मत द्या; दाेनशेची दारू ७० रुपयाला न्या : प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू
राज्यातील निवडणुका आल्या की, उमेदवार मतदारांना कोणतं आश्वासनं देतील याचा नेम नाही. पैसा, प्रवास, चैनीच्या वस्तूबराेबरच आता दारूचाही (Liquor) यामध्ये समावेश झाला आहे. आंध्र प्रदेशाच्या भाजप प्रदेशाध्याने मत मिळविण्यासाठी मतदारांना एक अफलातून आश्वासन दाखवलं आहे. “भाजपला मत दिलं तर २०० रुपयांची दारूची बाटली केवळ ७० रुपयाला देऊ”, असं आश्वासन आंध्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी दिले आहे.
आंध्रप्रदेशात जर भाजपची सत्ता आली, तर ५० रुपयाला एक क्वार्टर या किमतीत दर्जेदार दारू पुरवठा करणार असल्याचे आश्वासन मंगळवारी दिलं आहे. चांगल्या क्वालिटीची दारू सध्या २०० रुपयाला मिळते. मंगळवारी जाहीर सभेत बोलताना वीरराजू यांनी सांगितलं की, “सध्या वाढीव किमतीने राज्य सरकारकडून दारू विकली जात आहे. त्यात चांगले ब्रॅण्डदेखील नाहीत”, असा आरोप वीरराजू यांनी केला.
“राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर (Liquor) महिन्याला १२ हजार रुपये खर्च करत होती. ती रक्कम त्यांना एका योजनेच्या नावाखाली सरकारकडून दिली जाते. राज्यातील एक कोटी लोक दारूचे सेवन करत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत या एक कोटी लोकांनी भाजपाला मतदान करावे. भाजपाला एक कोटी मत मिळाली तर राज्यात ७५ रुपयाला बाटली या दराने चांगली दर्जेदार दारू मिळेल आणि महसूल उरला तर ती ७५ ऐवजी ५० रुपये प्रति बाटलीने विकली जाईल”, असा आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे.