निवडणूक विधानसभेची, तयारी महापालिकेची

(political news) कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप, आप, आणि काँग्रेसची जागा असल्यामुळे त्यांच्या सोबतचा राष्ट्रवादी पक्ष हे सारेच या निमित्ताने महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहेत. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक कधी होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, त्यापूर्वीच उत्तरची विधानसभा पोटनिवडणूक होत असून, महापालिकेलच्या 53 प्रभागांत या पक्षांना आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली आहे.

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वी 1990, 1995 ते 2004 या काळात शिवसेना, 2004 ते 2009 या काळात काँग्रेस तर 2009 ते 2014 या काळात शिवसेनेने या मतदारसंघात वर्चस्व मिळविले. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकात जाधव निवडून आले.

या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांना 91 हजार 53 मते मिळाली होती, तर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली होती. यावेळी शिवसेना-भाजपची युती होती, तरीही 15 हजार 199 मतांनी जाधव यांनी क्षीरसागर यांचा पराभव केला. जाधव यांच्या अकाली निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे.

त्यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली होती. तेव्हा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर 69 हजार 736 मते घेऊन निवडून आले होते, तर आता भाजपकडून इच्छुक असलेले सत्यजित कदम यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावरती लढवली होती. तेव्हा त्यांना 47 हजार 315 मते मिळाली होती, तर भाजपचे महेश जाधव यांना 40 हजार 104 मते मिळाली होती.  (political news)

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले व महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. त्यावेळी एखादी जागा रिक्‍त झाली तर त्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल त्याच पक्षाला ती जागा द्यायची आणि अन्य दोन पक्षांनी ताकदीने पाठिंबा द्यायचा, असे सूतोवाच नेत्यांनी केले होते. त्यानंतर झालेल्या पंढरपूर व देगलूर बिलोली या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी अभेद्य राहिली. पंढरपूरला महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला, तर देगलूर बिलोलीची जागा काँग्रेसने जिंकली.

कोल्हापूर उत्तरच्या जागेवर मात्र महाविकास आघाडीतच वाद आहे. शिवसेनेने ही जागा लढविण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला लढू द्या, अशी गर्भित इशारा देणारी भूमिका घेतल्याने आघाडीत ताण आहे. याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र मतदारसंघात मेळावे, बैठका सुरू आहेत. शिवसेनेला या निमित्ताने कोल्हापूर उत्तरमध्ये आपले नेमके स्थान आजमावता येणार आहे. महापालिकेच्या 53 प्रभागांत यासाठी मतदान होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र आहेत. त्यांनाही महापालिकेतील आपले स्थान भक्‍कम करायचे आहे.

भाजपलाही महापालिकेत आपली सत्ता आणावी असे वाटत आहे. त्यांनीही आपले स्थान आजमावण्याची तयारी केली आहे. या सर्वच पक्षांना आता महापालिकेसाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याची व त्यांना निवडणुकीसाठी तयार करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक विधानसभेची असली तरी तयारी महापालिकेची सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *