अंधार पडताच निघतो गांजाचा धूर; पोलिस कारवाई केव्हा…

गांजाचे (Hemp) व्यसन आता तरुणाईकडून विद्यार्थ्यांपर्यंत पसरत चाललेले आहे. कदमवाडी-भोसलेवाडीतील निर्जन ठिकाणी रात्री सातनंतर हे अड्डे फुलत आहेत. रिक्षातून येणार्‍या एकाने तर येथे खुलेआम विक्रीच सुरू ठेवली असून अनेकजण मध्यरात्रीपर्यंत येथे झिंगताना नजरेस पडत आहेत.

कदमवाडी, भोसलेवाडी, बापट कॅम्प याठिकाणी काही महिन्यांपासून एका रिक्षातून पानपट्टी साहित्याची विक्री केली जाते. सुरुवातीला मावा, सिगारेटसारख्या वस्तू विकणार्‍याने येथील तरुणांना गांजाची तलफ लावली. हळूहळू त्याच्याजवळ येणार्‍या तरुणांसोबत काही शालेय विद्यार्थीही आता गांजाच्या आहारी जात आहेत.

रात्री आठनंतर येथील बाकडी, कट्ट्यांचा आधार घेऊन हे झुरके घेणारे मध्यरात्रीपर्यंत झिंगत पडलेले दिसून येतील. ज्या ठिकाणी गांजा ओढणारे हे तरुण असतात त्याच्या शेजारीच एक ओपन जीम आहे. सायंकाळच्या सुमारास येथे येणारे ज्येष्ठ नागरिक, महिलांना, भागातील लोकांना या व्यसनाधीन तरुणांचा त्रास होतो आहे. अशातून वादाचे प्रसंगही घडताना दिसत आहे.

अजय, आकाश, प्रकाशचे कारनामे

मावा, गांजा (Hemp) आणि मटका अशा तीनही काळ्या धंद्याना कदमवाडीत आश्रय देण्याचे काम सध्या अजय, आकाश प्रकाश या तिघांकडून सुरू आहे. या तिघांनी चालवलेल्या या रॅकेटमध्ये गांधीनगर, कनाननगर, राजेंद्रनगरपर्यंतचे गिर्‍हाईक मिळत असल्याचे स्थानिक सांगतात.

पोलिस कारवाई केव्हा

याठिकाणी रात्रगस्त वाढविण्यासोबतच सायंकाळच्या वेळेस अशा व्यसनाधिन तरुणांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच हा नशेचा बाजार मांडणार्‍या रिक्षावाल्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *