कोल्हापूर हादरले! शेतजमिनीच्या वादातून वृद्धाचा खून, बाप लेक गंभीर जखमी

पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे विक्री झालेल्या शेतजमिनीच्या पैशाच्या वाटणीवरून वाद होऊन झालेल्या मारहाणीत रघुनाथ ज्ञानू पवार (वय 70 ) या वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. तर भगवान महादेव पाटील व त्यांचा मुलगा प्रतीक भगवान पाटील हे दोघे बाप लेक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून चौघांजणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की नागपूर- रत्नागिरी या हायवे रस्त्यामध्ये विश्वास पाटील व भगवान पाटील यांची जमीन गेल्याने शासनाने ही जमीन खरेदी केली. या पोटी या दोघांच्या खात्यावरती पैसे बँकेत जमा केले. या जमीन खरेदीची रक्कम वाटून घेण्यासाठी यांच्यामध्ये वाद सुरू होता. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान भगवान पाटील हे आपल्या घरासमोर हात पाय धूत असताना प्रवीण सुभाष पाटील या दोघांमध्ये शिवीगाळ होऊन जोरदार वाद झाला. यावेळी प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील व दिलीप शामराव गराडे यांनी भगवान पाटील यास काठीने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या चौघांच्या तावडीतून भगवान यांना सोडवण्यासाठी आलेले रघुनाथ ज्ञानू पोवार यांना वरील चौघांनी लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर विश्वास पाटील याने भगवान यांच्या घराचा दरवाजा दगडाने तोडून घरात घुसून घरात बसलेला प्रतीक भगवान पाटील यालाही दगडाने जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर वरील चौघे जण फरारी झाले.या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे स.पो. नि. शीतल कुमार डोईजड यांनी घटनास्थळी धाव घेतली रीतसर पंचनामा केला.या घटनेने पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याआधी राधानगरी तालुक्यात भाच्याचे भांडण सोडवताना मामाचा खून झाल्याची घटना घडली होती. आता पन्हाळा तालुक्यात आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे. एकाच आठवड्यातील दुसऱ्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *