वीजबिल वसुलीसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, या शहरांमध्ये होणार कारवाई

मराठवाड्यात औद्योगिक व वाणिज्यिक(Industrial and commercial) ३१ हजार ८५७ वीज ग्राहकांकडे ४३.८० कोटी रूपयांची थकबाकी आहे. नोटीस बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्त करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. घरगुती ग्राहकांसह आता वाणिज्यिक ग्राहकांवरही महावितरणने कारवाई बडगा उगारला आहे.
वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंप, पथदिवे अशा सर्व वर्गातील ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेद्वारे वीजबिल वसुलीला वेग देण्यात आला आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या कृषिपंप ग्राहकांसाठी सवलत देण्यात आली असून निम्मे बिल माफ करण्यात आले आहे. थकबाकीमुळे महावितरणचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. कोळसा खरेदी करण्यासाठी खासगी कंपन्यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे कुणालाही वीजबिल माफ होणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर महावितरणने नोटीसा बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मराठवाड्यात ६२०५ औद्योगिक वीज ग्राहकांकडे ११.७१ कोटी रूपये थकबाकी आहे. वाणिज्यिक २५,६५२ ग्राहकांकडे ३२.०८ कोटी रूपये थकबाकी आहे.
दरम्यान, वीजबिल वसुलीसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. ग्राहकांना वारंवार सूचना करण्यात येत आहेत. मराठवाड्यात जवळपास १५ हजार कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. महावितरणची पूर्ण यंत्रणा कार्यरत झाली आहे. पण, अद्याप एकूण थकबाकीच्या तुलनेत जेमतेम वीजबिलांचा भरणा झाला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *