बंदीजनांच्या ’मेड इन कळंबा’ वस्तूंना डिमांड!

कळंबा कारागृहात बनणार्‍या फर्निचर, कपडे, बेकरी उत्पादनाला प्रतिसाद मिळत असून कळंबा मेड खुर्च्यांना राज्यभरातून विशेष मागणी (demand) आहे. सध्या 1 कोटी रुपयांची फर्निचर निर्मितीची ऑर्डर पूर्ण करण्याची लगबग कारागृहात सुरू आहे. कळंबा कारागृह येथे बनणारे फर्निचर व कपड्यांना सर्वत्र मागणी आहे. तसेच बेकरी उत्पादनांनाही ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूलकर यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून कळंबा कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, यंत्रमाग, बेकरी उत्पादन, शिवणकाम, जारीकाम सुरू आहे. शासकीय कार्यालयांमध्ये जी फर्निचर खरेदीवेळी कारागृहातील फर्निचरला प्राधान्य दिले जाते. यामाध्यमातून सध्या कळंबा येथे खुर्ची, टेबल, लाकडी मंदिरे, रूमाल, सतरंजी, टॉवेल, बेडशीट, लोखंडी कपाटे, बिस्किटे, नानकटाई, टोस्ट, पॅटीस सारखी उत्पादने तयार होत आहेत.

नागपूरला जाणार खुर्च्या नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयासाठी 50 लाख रुपयांच्या खुर्च्यांची ऑर्डर पूर्ण करण्याचे काम कळंबा कारागृहात सुरू आहे. यातून 566 खुर्च्या दिल्या जाणार आहेत. तसेच राजाराम महाविद्यालयातील सुक्ष्मजीव विभागासाठी 30 लाख 88 हजार रपयांचे फर्निचर बनविण्यात येत आहे. वन विभागाने 5 लाख 60 हजारा रुपयांचे सोफा, खुर्ची, टेबले मागविली आहेत.

पोलिस कार्यालयांकडून मागण्या

पोलिस आयुक्‍त ठाणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयांकडून 20 हजार 787 सतरंजी, 6517 मच्छरदाणीची मागणी (demand) आहे.

गणवेश शिलाई

कळंबा कारागृहाच्या शिवणकाम विभागात गणवेश शिलाई चालते. जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग व कागल यांनी सुमारे 1 हजार गणवेश, सलवार, स्कर्टची मागणी केली असून त्याचेही काम सध्या सुरू असल्याचे कारागृहातील कारखाना व्यवस्थापनाचे प्रमुख आर. एस. जाधव यांनी सांगितले.

शिक्षणाचा वाढला टक्‍का

कारागृहात सुरू असलेल्या ग्रंथालयामार्फत इच्छुक बंद्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. सध्या कळंबा कारागृहातील ग्रंथालयात 250 पुस्तके आहेत. येथील अभ्यासकेंद्राच्या माध्यमातून 146 जणांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाची पदवी प्राप्‍त केली आहे. सध्या 219 जणांनी बारावी व पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्याचे शिक्षक बालाजी म्हेत्ते यांनी सांगितले. असल्याचे शिक्षक बालाजी म्हेत्ते यांनी सांगितले.

लाडू निर्मितीसाठी पत्रव्यवहार

करवीर निवासिनी अंबाबाईच्या लाडू प्रसाद बनविण्याचे काम जून 2016 मध्ये कळंबा कारागृहाकडे सोपविण्यात आले होते. 2016 ते मार्च 2020 या काळात जवळपास 40 लाख लाडूतून 3 कोटी 20 लाखांचे उत्पन्‍न मिळाले होते. यातून शासनला 87 लाखांचा नफा झाला होता. मात्र, कोरोनानंतर ही लाडू निर्मिती बंद असून ती सुरू करण्यासाठी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी, प. महाराष्ट्र देवस्थान समितीसोबत पत्रव्यवहार केला आहे, असे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *