कोल्हापूर : सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी (election) भाजपची उमेदवारी माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांना जाहीर झाली. त्यांच्या नावाचा पक्षाचा एबी फॉर्मही आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद असून त्यामध्ये ते याची घोषणा करणार आहेत.

कदम हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी यापूर्वी 2014 ला याच मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली आहेत. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यावर माजी खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर कदमही त्यांच्यासोबत भाजपचे काम करू लागले आहेत. कदम हे महाडिक यांचे पाहुणे आहेत. आगामी महापालिका निवडणूक, महाडिक गटाची ताकद, कदम यांचा जुन्या पेठेतील पैपाहुण्यांचा बुडका आणि आर्थिक ताकद याचा विचार करून सत्यजित कदम यांना भाजपने उमेदवारी निश्चित केल्याचे सांगण्यात येते.

या निवडणुकीसाठी (election) एकूण सहा जणांनी उमेदवारी मागितली होती. त्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांचे नाव चर्चेत होते. त्यांनीही पक्षातर्फे 2014 ला याच मतदार संघातून निवडणूक लढवून 40 हजार मते घेतली होती. त्यामुळे पक्षाने आपल्याला संधी द्यावी असा त्यांचा आग्रह होता पण ही उमेदवारी कदम यांनाच मिळणार याची कुणकुन त्यांना लागली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पक्ष निष्ठेला हेच का फळ, संधीसाधूना उमेदवारी अशा आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. ती नंतर मागे घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *