गलथानपणा की अपघात? सात दशकांतील पहिलीच घटना

राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट अचानक उघडून पाणी वाया गेल्यामुळे धरण (dam) स्थळावरील गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

1896-97 साली कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळापासून धडा घेऊन राजर्षी शाहू महाराज यांनी 1908 साली राधानगरी धरणाची पायाभरणी केली होती. 1949 साली प्रथम पाणीसाठा करण्यात आला. 8.36 टी.एम.सी. क्षमतेच्या या धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कृषी व औद्योगिक क्रांती झाली. याच धरणाच्या पायथ्याला राज्यातील पहिला व देशातील दुसरा जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारला. मात्र, सध्या खासगीकरणाच्या रेट्यापुढे हा प्रकल्प बंद पडला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. मात्र, 2006 व 2019 चा अपवाद वगळता धरणाचे मुख्य भिंतीतील आपत्कालीन दरवाजे कधी उघडावे लागले नव्हते. 2006 साली आपत्कालीन दरवाजा 14 फुटांनी उचलला असता महापुराचे पाणी फेजिवडे व गुडाळवाडी गावांत घुसून मोठे नुकसान झाले होते. 2019 साली वर उचललेला दरवाजा पूर्ववत बसविण्यासाठी तब्बल 28 तास संघर्ष करावा लागला होता.

धरणस्थळावर खासगी ठेकेदारामार्फत तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू असताना सकाळी नऊच्या सुमारास आपत्कालीन दरवाजा अचानक अठरा फुटांनी वर उचलला गेला. त्यामुळे काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक चार फुटांनी पाणीपातळी वाढल्याने नदीकाठावरील विद्युत पंप बाजूला घेताना शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. त्याचबरोबर धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्याच्या अफवा पसरल्याने लोकांची पाचावर धारण बसली होती.

धरणस्थळावर काम सुरू असताना पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी स्वतः हजर राहून कामे करून घेणे आवश्यक होते. मात्र, सकाळी आठच्या सुमारास दरवाजा वर उचलला जाऊन पाणी बाहेर पडले. त्या दरम्यान कोणीही अधिकारी जागेवर नव्हता. भोगावती नदीला पूरसदृश परिस्थितीत निर्माण झाल्यानंतर अधिकारी धरणस्थळावर आले. मात्र, तोपर्यंत दरवाजातून प्रतिसेकंद सुमारे सहा हजार क्युसेक्स पाणी बाहेर पडत होते. तब्बल सहा तासांनी दरवाजा पूर्ववत बसवला. मात्र, तोपर्यंत सुमारे अर्धा टी.एम.सी. पाणी वाया गेले होते.

एवढ्या मोठ्या संवेदनशील धरणावर (dam) काम सुरू असताना घडलेली दुर्घटना म्हणजे हा गलथानपणा की अपघात? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राधानगरी धरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी-पनोरीकर यांनी केली आहे.

सात दशकांतील पहिलीच घटना

मुसळधार पावसात धरणाच्या भिंतीवर ताण पडू लागला की, आपत्कालीन दरवाजा उघडला जातो. मात्र, ऐन हिवाळ्यात हा दरवाजा आपोआप उघडला जाण्याची धरणाच्या सात दशकांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे जलसंपदा खात्याच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बेफिकिरी धोकादायक

राधानगरी धरण ऐतिहासिक व संवेदनशील आहे. या ठिकाणी दरवाजे उघडणे व बंद करणे याबाबतची सखोल माहिती असणारे तांत्रिक तज्ज्ञ नेहमी उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, येथे एकही तज्ज्ञ नाही. अशी घटना घडली की, कोल्हापूर, पुण्यापर्यंत मदतीसाठी धावाधाव करावी लागते. लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणार्‍या या धरणाबाबतची ही बेफिकिरी धोकादायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *