“आता सुरू झालेले वाकयुद्ध गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगेल यात शंकाच नाही”
(political news) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी थेट पुण्यात येऊन राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. राजीनामा देऊन मैदानात या, असे म्हणत शिवसेनेला डिवचले. याचे चोख प्रत्यूत्तर सोमवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य, म्हणत शाह यांना चिमटा काढला. यामुळे येणाऱ्या काळात भाजप विरुद्ध शिवसेना सुरू झालेले वाकयुद्ध आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगेल यात शंकाच नाही.
शाह काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी प्रवरानगर येथे हजेरी लावल्यानंतर काल पुण्यात कार्यक्रम केले. यावेळी बोलताना शाह यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवर शरसंधाण साधण्याची संधी सोडली नाही. शाह म्हणाले, पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असे म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असे खुले आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे याची सोमवारी सव्याज परतफेड केली आहे. (political news)
राऊतांचे उत्तर
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना भाजप आणि गृहमंत्री शाह यांना चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. पुण्याच्या भूमीत येऊन खोटे बोलू नका, असा जोरदार हल्ला त्यांनी भाजपवर चढवला. विधानसभेच्या निवडणुकीत 50-50 टक्के सत्तेचे सूत्र ठरले होते, या वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. शिवाय महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपला 105 जागा अशक्य आहे, असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले. वाढत्या इंधन किमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. राऊत म्हणाले की, इंधनाचे दर दहा रुपयांनी वाढवायचे आणि चार रुपयांनी कमी करायचे हे सरकारला शोभत नाही. शिवाय ईडी, सीबीआय हे भाजपचे चिलखत आहे. मात्र, त्यामुळे आम्हाला कसलाही फरक पडत नाही, हे सांगायला राऊत विसरले नाहीत.