कोल्हापूर महापालिकेत उडाली तारांबळ
शहरातील मंगळवार पेठेत सामायिक मिळकतीत बेकायदेशीर बांधकाम झाले असल्याने ते पाडावे यासाठी एकाने अर्ज केला होता. महापालिकेच्या नगररचना विभागात अर्ज करून आणि कारवाईसाठी विनंती करून संबंधित वैतागले. अखेर संबंधित व्यक्तीने महापालिकेत येऊन आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन (self immolation) करण्याचा इशारा दिला. परिणामी, गुरुवारी दिवसभर महापालिकेत तारांबळ उडाली. अग्निशमन दल, रुग्णवाहिकेसह पोलिसांचा दिवसभर बंदोबस्त तैनात होता. अखेर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित व्यक्तीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करावी, असे आदेश नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांना दिले. त्यानंतर संबंधित व्यक्ती परत गेली.
मंगळवार पेठेत राजेंद्र नाळे यांची सामायिक मिळकत आहे. या मिळकतीतील बेकायदेशीर बांधकाम काढावे म्हणून 14 डिसेंबरला अधिकार्यांनी येऊन पाहणी केली; पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. काही अधिकारी जाणीवपूर्वक बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, 15 डिसेंबरला आयुक्त कार्यालयात भेटून कारवाई न झाल्यास 23 डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नाही. परिणामी, आज सकाळी नाळे यांनी पोलिसांत जाऊन आत्मदहन (self immolation) करत असल्याचा अर्ज दिला. त्यामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ सुरू झाली. पोलिसांनी महापालिकेत आयुक्त कार्यालयात घटनेची माहिती दिली.
महापालिकेसमोर दुपारपासून अग्निशमन दलाचे वाहन व जवान, रुग्णवाहिका, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नाळे हे आयुक्त कार्यालयात आले. दुपारी तीन वाजता प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याशी भेट झाली. डॉ. बलकवडे यांनी नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक महाजन यांना बोलावून घेतले. नाळे यांची तक्रार समजून घेतली. कार्यवाहीत दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता महाजन यांनी नाळे यांच्या तक्रारीविषयी कार्यवाही करण्याचे ठरले. त्यानंतर नाळे परत गेले आणि महापालिका अधिकारी व पोलिसांचा जीव भांड्यात पडला. यामुळे दिवसभर सर्व यंत्रणा महापालिकेच्या दारात होती.
माजी नगरसेवक पुत्राची अधिकार्याला दादागिरी
महापालिका आरोग्य विभागातील झाडू कामगार व सफाई कामगारांच्या बदलीसाठी एका माजी नगरसेवक पुत्राने मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना दादागिरी केली. अरेरावी करत त्यांच्या अंगावर धाऊन गेल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर पवार यांनीही संबंधिताला आम्ही जनतेचे नोकर आहोत, तुम्ही आमचे मालक नाही, असे ठणकावून सांगितले.
नगरसेवक पुत्राच्या रोजच्या त्रासाला महापालिकेतील अनेक अधिकारी अक्षरशः वैतागले आहेत. महापालिका प्रशासनानेच ठोस कारवाई करावी, अशी मागणी अधिकारी वर्गातून केली जात आहे.
एका राजकीय पक्षाच्या आधारे माजी नगरसेवकाचा पुत्र महापालिकेत रोज विविध कारणांनिमित्त येत असतो. अधिकारी व कर्मचार्यांशी उद्धट वर्तन करतो. अरेरावी करून अधिकार्यांना वेठीस धरतो. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संबंधिताने मुख्य आरोग्य निरीक्षक पवार यांच्याकडे दोन अर्ज आणून दिले. झाडू कामगार व सफाई कामगार यांच्या बदलीचे ते अर्ज होते. दोघांची तत्काळ बदली करावी म्हणून त्याने पवार यांच्याशी हुज्जत घातली.
पवार यांनी आरोग्य निरीक्षकांकडून अहवाल मागवून कार्यवाही करू, असे सांगितल्यानंतरही त्याने तुम्हाला मी त्या आरोग्य निरीक्षकांच्या उद्या सह्या आणून देतो, आता तुम्ही लगेच सही करा, असे सांगितले. पवार यांनी तसे होऊ शकत नाही, उद्या पाहू असे स्पष्ट केले. त्यानंतर पवार यांच्याबरोबर तो उद्धट वर्तन करून अरेरावी करू लागला. अखेर पवार यांनीही त्याला अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले.
दरम्यान, यापूर्वीही संबंधित नगरसेवक पुत्राने मंगळवार पेठेतील बी वॉर्ड कार्यालयामध्ये जाऊन दमदाटी केली होती. कर्मचार्यांची हजेरी घेऊन तेथील साहित्याची तपासणी केली होती. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या घटनेचीही माहिती पवार यांनी डॉ. बलकवडे यांना दिली. डॉ. बलकवडे यांनी संंबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.