शिरोळ : तालुक्याच्या राजकारणात दीर्घकाळ एकत्र असणाऱ्या दोन साखर सम्राटांनी ठोकला बँकेत शड्डू

(local news) शिरोळ (Shirol) तालुक्याच्या राजकारणात दीर्घकाळ एकत्र असणाऱ्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar)आणि गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) या दोन साखर सम्राटांनी जिल्हा बँकेत शड्डू ठोकला आहे. या साखर सम्राटांच्या तुल्यबळ लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. तालुक्याच्या भविष्यातील राजकारणाची समीकरणे बदलून टाकणाऱ्या या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

माजी आमदार सा. रे. पाटील आणि यड्रावकर यांच्यात २०१४ पासून राजकीय संबंधातील गोडवा वाढत गेला. सा. रे. पाटील यांच्या नंतरही गणपतराव पाटील यांच्याशी मिळते-जुळते घेतले. काही निवडणुकीत गणपतराव-यड्रावकर एकत्र दिसलेही; पण कारखाना, बँक, शिक्षण संस्था आणि शेती यापलीकडे त्यांची राजकीय फारशी राजकीय अभिलाषा नव्हती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षियांचा पाठिंबा आणि विजयी होण्याची खात्री असल्याने त्यांनी निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी,(Raju Shetti) माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळींची साथ मिळाल्याने जिल्हा बँकेत आता मागच्या नव्हेतर पुढच्या दाराने जाण्यासाठी त्यांनी स्वीकृतचा प्रस्ताव धुडकावला. (local news)

नेतृत्वाखाली असणाऱ्या संस्थांचा अपवाद वगळता पहिल्यांदाच गणपतराव पाटील जिल्हा बँकेच्या माध्यमातून आखाड्यात उतरले आहेत. नेते एका बाजूला असले तरी मतदार आपल्या बाजूने असल्याचा दावा करत यड्रावकर यांनी विजयाचा दावा केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते आणि मतदारांचा आपणास पाठिंबा असल्याने आपण जिल्हा बँकेच्या नक्की पोहोचू असा आशावाद गणपतराव पाटील यांना आहे.

जिल्ह्याचे लक्ष

विधानसभा निवडणुकीत सा. रे. पाटील विरुद्ध यड्रावकर अशी लढत होऊनही दोघांत कटुता निर्माण झाली नाही की कार्यकर्ते दुखावले नाहीत. मात्र बँकेच्या निवडणुकीत काय होणार हे पाहणे गरजेचे आहे. बँकेच्या माध्यमातून प्रथमच दोघे साखर सम्राट एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. सेवा संस्था गटातून होणाऱ्या या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *