इचलकरंजी नगरपालिका सभेत ‘हा’ ठराव मंजूर

इचलकरंजी नगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची बुधवारी झालेली अखेरची सर्वसाधारण सभा (assembly) तब्बल आठ तास चालली. आजच्या सभेत घरफाळा वाढीचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. इचलकरंजी महापालिका होण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. बहुचर्चित 26 आरक्षणे उठवण्याच्या विषयाला तीन नगरसेवकांनी विरोध दर्शवला. मात्र बहुमताने आरक्षण रद्दचा विषयही मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.

मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे यासह विषयपत्रिकेवरील 78 आणि ऐनवेळच्या 1 अशा 79 विषयांवर चर्चा करण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. दुपारी 12.15 वाजता सभेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच शहरातील विस्कळीत पाणी पुरठ्यावरून नगरसेवक आक्रमक बनले. मंगळवार पेठेतील अपुर्‍या, अनियमित पाणी पुरवठ्यावरून राहुल खंजिरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आमदार प्रकाश आवाडे यांनी 100 शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी 4 कोटी रुपये निधी दिला. मात्र दोन वर्षांनंतरही यातील केवळ 62 शुद्ध पेयजल प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र विद्युत पुरवठा जोडला नसल्यामुळे हे प्रकल्पही सुरू झाले नसल्याची खंत सुनील पाटील यांनी व्यक्त केली. सांगली रस्त्यावरील काही घरांमध्ये मोटार बसवूनही पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र त्यांच्याकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल केली जात असल्याची टीका नगरसेविका संगीता आलासे यांनी केली. सभापती दीपक सुर्वे यांनी शुद्ध पेयजल प्रकल्पांचे काम मक्तेदार जाणीवपूर्वक करीत नसल्याचा आरोप करीत, थर्ड पार्टी ऑडिटचे पैसे कोण देणार, असा मुद्दा मक्तेदार उपस्थित करीत असल्याचे सांगितले. तसेच पालिका महावितरणचे 4 कोटी रुपये वीज बिल देणे आहे. त्यामुळे विद्युत कनेक्शन लवकर मिळत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीची सर्वसाधारण सभा (assembly) ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. त्यामुळे या सभेनंतर इतिवृत्तात काही विषय घुसडले आहेत का, असा सवाल करीत संपूर्ण इतिवृत्त वाचून दाखविण्याची मागणी नगरसेवक शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे यांनी केली. त्यामुळे मागील संपूर्ण इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले.

इचलकरंजीची महापालिका व्हावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. नगरसेवक मोरबाळे यांनी महापालिका होण्यासाठी अधिनियमात कोणत्या तरतुदी आहेत, हे स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी, महापालिका होण्यासाठी प्रथम इरादा घोषित करावा लागतो. शिवाय 3 लाख लोकसंख्येचा निकष आदींची स्पष्टता ठेंगल यांनी केली. यावेळी काही नगरसेवकांनी तांत्रिक मुद्देही उपस्थित केले. अखेरीस एकमताने महापालिका करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

यापूर्वीच्या टॅब प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा टॅब पुरवण्यात पुन्हा गैरप्रकार होण्याची शक्यता नगरसेवक मोरबाळे, बावचकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची मागणी केली. मात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्यास पालकांकडून दुरुपयोग होऊ शकतो, असे सभापती मनोज साळुंखे यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावर विरोधकांनी उपसूचना मांडली. ही उपसूचना 14 विरुद्ध 26 मतांनी नामंजूर करण्यात आली.

शहरातील विविध 26 आरक्षणे उठवण्यावर सभेत चर्चा झाली. वास्तविक 21 रोजी अजेंडा काढल्यानंतर या विषयांची फाईल 28 पर्यंत वाचनासाठी मिळाली नसल्याची तक्रार नगरसेवक बावचकर यांनी केली. त्यामुळे हे 26 विषय रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. ठेंगल यांनी नियोजन समितीच्या सभेचा कोरम पूर्ण नसल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे नगररचना खात्याकडून सभेचा कोरम पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी आपण पत्र दिले होते. त्यांचा अभिप्राय मिळाल्यानंतर फाईलवर सह्या केल्याचे सांगितले. मात्र महापालिका करण्यासाठी आपण एकमताने ठराव केला आहे. आजची आरक्षणे रद्द झाल्यास भविष्यात शहराचे नियोजन कठीण बनणार आहे. केवळ बहुमताच्या जोरावर आरक्षण रद्द करू नयेत, अशी सूचना केली.

नगररचनाकार कुलकर्णी यांनी प्ले ग्राऊंडचे आरक्षण वगळता येणार नाहीत, असे स्पष्ट करीत आजच्या विषयपत्रिकेवरील प्रस्ताव अप्रस्तुत असल्याचे स्पष्ट केले. यावर चर्चा सुरू असतानाच नगरसेवक बावचकर, मोरबाळे, संजय कांबळे यांनी आरक्षण रद्द करावेत, अशी मागणी लावून धरली. अखेर तीन नगरसेवक वगळता अन्य नगरसेवक आरक्षण रद्द न करण्यावर ठाम राहिल्यामुळे बहुमताने 26 विषय मंजूर करण्यात आले. चर्चेत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अजित जाधव, सागर चाळके, मदन झोरे, राजू बोंद्रे, अशोक जांभळे, अब्राहम आवळे, सायली लायकर आदींनी सहभाग घेतला होता.

पुतळा बसविण्याबाबत चर्चा

कॉ. मलाबादे चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तर थोरात चौक व महात्मा गांधी हौसिंग सोसायटीच्या प्रांगणात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याबाबत सभेत चर्चा झाली.

अखेर शहापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *