नितेश राणे यांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण; आज फैसला
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात बुधवारी दुसर्या दिवशी अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण झाली. आमदार नितेश राणे तसेच संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना अटकपूर्व जामीन मंजूर होऊ नये यासाठी सरकार पक्षाच्या वतीने दोन्ही विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात बरेच महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
या प्रकरणात आमदार नितेश राणे यांचा सहभाग आहे हे निदर्शनास आणण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने या सर्व प्रकरणाची लिंक जोडण्यात आली आहे. तर, आमदार राणे यांच्या वतीने आपली बाजू परत मांडताना वकील संग्राम देसाई यांनी हे मुद्दे खोडून टाकण्याचा प्रयत्न केला.संतोष परब हल्ला प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाचे वकील आणि अर्जदार पक्षाच्या वतीने युक्तिवाद दुसर्या दिवशी सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्यासमोर पूर्ण झाला. याप्रकरणीचा निर्णय आज गुरुवारी जाहीर होईल. आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या वतीने वकील संग्राम देसाई, वकील राजेंद्र रावराणे, वकील उमेश सावंत आदी काम पाहत आहेत. तर, या प्रकरणात राज्य सरकारने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत आणि भूषण साळवी हे काम पाहत आहेत. तसेच, फिर्यादी संतोष परब यांच्या वतीने सातारा येथील वकील विकास पाटील-शिरगावकर हे काम पाहत आहेत.पोलिस तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली काही गुप्त कागदपत्रे सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात हजर करण्यात आली आहेत. सरकार पक्षाच्या वतीने बुधवारी तब्बल अडीच तास सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यानंतर नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी सरकारी पक्षाच्या वकिलांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ही सुनावणी पूर्ण व्हायला पावणेसहा वाजले. त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी याबाबतचा निकाल देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला जातोय की मंजूर केला जातोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना एका राज्यात त्यांना लपवले गेले असेल तर ते कसे सापडणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून संजय राऊत यांचा रोख गोव्याकडे असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.
शिवसेनेचा प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले आ. नितेश राणे यांच्या शोधात सिंधुदुर्ग पोलिस असून, त्यांचा ठावठिकाणा काय आहे याची माहिती घेण्यासाठी पोलिस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. नितेश राणे गोव्यामध्ये असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. नितेश राणे गोव्यात आहेत का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांमध्येही उपस्थित केला जात होता. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळला तर पुढील कारवाई कशी करायची याबाबत कणकवली पोलिस स्थानकात जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानावरून पोलिस नितेश राणे यांच्या शोधासाठी पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्येही गेल्याची माहिती बाहेर पडते आहे. परंतु, नितेश राणे यांचा पत्ता लागला नव्हता