बैलगाडी शर्यतीला स्थगिती
मागील दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होणाऱ्या बैलगाडी शर्यत स्थगित करण्यात आल्या आहेत. आंबेगावमधील चिंचोडी लांडेवाडी आणि मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकण येथे शनिवारी (दि.१ जानेवारी) बैलगाडी शर्यत होणार होत्या. या दोन्ही गावातील शर्यती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.शासनाकडून नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये धार्मिक आणि सामाजिक नागरिकांची जास्तीतजास्त 250 नागरिक उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शर्यतीदरम्यान 250 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने बैलगाडी शर्यती स्थगित करण्यात आल्या आहेत. (बैलगाडी शर्यत)स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविलेल्या अहवालानुसार शर्यतीमध्ये 250 बैलगाडी आणि प्रत्येक बैलगाडी सोबत वीस नागरिक उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शनिवारी होणाऱ्या शर्यती स्थगित करण्यात आल्या आहेत.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस अटी व शर्तींचे पालन करून परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य शासनाने बैलगाडी शर्यतीस परवानगी देत असल्याचा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यती सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार जिल्ह्यातून शर्यती आयोजित करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज करत आहेत. नववर्षाच्या पाहिल्याच दिवशी जिल्ह्यात शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती मात्र कोरोनाच्या शासनाच्या निर्बंधामुळे शर्यतीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे.