‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’

राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी २०२२ या दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राबिवण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी केले आहे. या अभियानादरम्यान करोना साथरोगासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वाचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये ३ आणि १२ जानेवारी रोजी अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन, ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई आणि १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ वेशभूषा, ४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र, ५ जानेवारी रोजी विविध विषयांवर निबंधलेखन, ६ जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा, मुलाखती, ७ जानेवारी रोजी आनंदनगरी प्रदर्शन, ८ जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले शिल्प, १० जानेवारी रोजी पोवाडागायन तसेच समूहगायन, ११ जानेवारी रोजी व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन, तर १२ जानेवारी रोजी एकांकिका, एकपात्री नाटिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *