नववर्ष स्वागतासाठी लोणावळानगरी सज्ज
नवर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचे आकर्षण लोणावळा- खंडाळा येथील पर्यटनस्थळासह मावळातील विविध पर्यटनस्थळी पर्यटकांनी सायंकाळी गर्दी केली होती.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटननगरी लोणावळा-खंडाळा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे; मात्र ओमायक्रोन विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सर्व ऋतूत पर्यटनासाठी नावलौकिक असणार्या लोणावळा-खंडाळा या पर्यटन स्थळांसह मावळातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांची आकर्षण ठरत आहे. या पर्यटनस्थळाना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही पर्यटकांचा ओघ कायम असतो. मागील काही वर्षापासून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (थर्टीफस्ट) सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्याची मोठी क्रेज नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे लोणावळा खंडाळा यासारख्या पर्यटनस्थळांना नागरिक प्राधान्य देत असतात; मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन आणि विविध निर्बंध यामुळे नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.
लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टायगर, लायन्स व राजमाची ह्या पॉइंट्सह कार्ला, भाजे लेणी, पवना, भुशी, लोणावळा, तुंगार्ली ही जलाशये आणि भोवतालचा परिसर.लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची व कोराईगड या गड किल्ले परिरात पर्यटकांच्या संख्या थोडी घटल्याचे चित्र होते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे निर्बंध हटवल्याने पर्यटकांची वर्दळ पुन्हा लोणावळा- खंडाळा परिसरात वाढली आहे; मात्र ओमायक्रोनच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पर्यटकांची संख्या काही प्रमाणात घडली असल्याचे चित्र आहे.