तीन मुलं असूनही मुलींनी दिला आईला अखेरचा खांदा

आई सारखे दैवत नाही…. ही उक्ती पदोपदी खरी ठरते. ‘आई’ एक असं नातं जे तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासोबत राहतं. मग ती परिस्थिती कशीही असो. पण जेव्हा आईला शेवटच्या क्षणी देखील मुलं त्रास देतात तेव्हा…. त्यांच्या सारखे करंटे कुणीच नाही.

आई-वडिलांना दिर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना अनेक जण करतात. पण ज्यांच्या पालकांना हा आशिर्वाद मिळतो ते त्यांचा सांभाळ मात्र करत नाहीत. अशीच घटना औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये घडली आहे.

एक नव्हे तब्बल तीन मुलं असूनही आई तब्बल वीस वर्ष मुलीच्या घरी राहिली. शेवटच्या काळात तिन्ही मुलांना भेटण्याची इच्छा असूनही मुलं आईच्या भेटीला आले नाहीत. अखेर त्या आईने मुलांची वाट पाहत अखेरचा श्वास घेतला.

आईच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोन मुले अगदी पाहुण्यासारखे आले. पण संतप्त मुलींनी आईच्या मृतदेहाला हातही लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमित गेल्या आणि त्यांनीच अंत्यसंस्कार केले.

90 वर्षीय चंद्रभागाबाई आनंदा साखळे असं त्या दुर्दैवी आईचं नाव. त्यांना सुभद्राबाई टाकसाळे, सुनीता सोने, जिजाबाई टाकसाळे या तीन मुली आणि जाऊबाई छाया शिरसाठ यांनी खांदा दिला.

मुलांनी आपल्या आईला वाऱ्यावर सोडले. त्या माऊलीला तरीही आपल्या पोटच्या मुलांची अखेरची भेट घ्यायची होती. मात्र त्या मुलांनी आईला भेटण्याचे एकदाही कष्ट घेतले नाहीत. अखेर मुलांच्या भेटीविना आईने आपले प्राण सोडले.

तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. दहा वर्षे आई आम्हा बहिणींकडे आलटून पालटून राहते. गेल्या वीस वर्षांपासून आई माझ्याकडे राहते. मुलगी या नात्याने मी आईचा सगळा सांभाळ केला. पण तरी देखील तिला मुलांना भेटण्याची इच्छा होती. पण माझे भाऊ कर्तव्य विसरले. असे निर्दयी भाऊ आणि मुले कुणाला मिळू नयेत, अशी खंत सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे या मुलीने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *