‘ही’ मगरमिठी सैल होणार की आणखी घट्ट

कोल्हापूरची वरदायिनी पंचगंगेला प्रदूषणाची (pollution) मगरमिठी बसली आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. हा आराखडा सादर होणार कधी आणि त्याची अंमलबजावणी करणार कशी, यावरच पंचगंगेची ही मगरमिठी सैल होणार की आणखी घट्ट होणार हे ठरणार आहे. याकरिता नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची गरज आहे.

पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचवले गेले. पंचगंगेचे प्रदूषण गंभीर वळणावर पोहोचले. यामुळे पंचगंगेची गटारगंगा झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या कोल्हापूरची, दक्षिण काशीची पंचगंगा अशी ओळख असलेल्या पंचगंगेची गेल्या काही वर्षांत राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नदीपैकी एक अशी ओळख बनली.

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही याची गंभीरपणे दखल घेत नियंत्रणासाठी विभागीय आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीला दर तीन महिन्यांनी अहवाल न्यायालयाला सादर करावा लागतो, तरीही प्रशासन ढिम्मच आहे.

कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील 37 गावांचा प्रामुख्याने पंचगंगा प्रदूषणास (pollution) हातभार लागतो. यामुळे पंचगंगा प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी या दोन शहरांसह 37 गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात दररोज 96 एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी सध्या 90 ते 91 सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाण्यावरही प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण या कामाला गती द्यायला पाहिजे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुमारे 23 एमएलडी सांडपाणी मिसळते. विविध उद्योगांतून सुमारे 18 एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. मात्र, त्यावर प्रक्रिया होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी वारंवार पंचगंगा प्रदूषित होऊन मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर कमी खर्चातील एसटीपी उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची गती वाढवणे आवश्यक आहे.

कोल्हापूरची वरदायिनी पंचगंगेला प्रदूषणाची मगरमिठी बसली आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. हा आराखडा सादर होणार कधी आणि त्याची अंमलबजावणी करणार कशी, यावरच पंचगंगेची ही मगरमिठी सैल होणार की आणखी घट्ट होणार हे ठरणार आहे. याकरिता नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची गरज आहे.

इचलकरंजी शहरात दररोज 38 एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी 20 एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया होते. सुमारे 18 एमएलडी पाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. या सांडपाण्यासह घरगुती उद्योगातून निर्माण होणार्‍या 6 एमएलडी पाण्याचा विचार करून सुमारे 30 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी सामूहिक पाठपुराव्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *