कोल्हापूरमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी
कळंबा कारागृहातील वरिष्ठ महिला तुरूंगाधिकारी मिरा विजय बाबर ( वय ३८, रा. मध्यवर्ती शासकीय निवासस्थान, कळंबा ) यांना गोळ्या घालण्याची धमकी देवून शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना कळंबा कारागृह आवारात घडली. याप्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील बडतर्फ महिला पोलीस उज्वला झेंडे यांच्यासह दोघांविरुध्द राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताना अद्याप अटक झालेली नाही.
कारागृह प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून संशयिताविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कोल्हापूर पोलीस दलातील बडतर्फ महिला पोलीस झेंडे यांचा मुलगा न्यायाधिन बंदी असून सद्या त्याचे वास्तव्य कळंबा कारागृहात आहे.
रविवारी सायंकाळी साडेचारला उज्वला झेंडेसह बंगे नामक व्यक्तीने विनापरवाना कळंबा कारागृह आवारात प्रवेश केला. कारागृहात सद्या गंभीर गुन्ह्यातील न्यायाधिन बंदींचे वास्तव्य असल्याने सुरक्षिततेच्या दृष्ट्रीने कळंबा कारागृह आवारासह परिसरात प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. कारागृह रक्षकांनी झेंडेसह समवेत आलेल्या व्यक्तीला तेथून बाहेर जाण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी झाली.
याप्रकारानंतर वरिष्ठ महिला तुरूंगाधिकारी मिरा बाबर तेथे आल्या. त्यांनीही कारागृह आवारात प्रवेश करण्यास मनाई असल्याने तत्काळ येथून जाण्यासाठी सुचना केल्या. त्यावर झेंडे यांनी माझा मुलगा कारागृहात आहे. असे सांगून ‘माझ्या मुलाला गोळी कोणी मारली? असे का विचारले, असा तिने जाब विचारला. त्यानंतरही तिने ‘गोळ्या घालण्याची हिंमत होती आणि मी गोळ्या घातलेल्या आहेत. अजूनही गोळ्या घालू शकते’ अशी धमकी देवून शिवीगाळ केल्याचे तुरूगाधिकाऱ्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
गोळ्या घालण्याची धमकी आणि झालेल्या वादानंतही तुरूंगाधिकारी मिरा बाबर यांनी झेंडेसह समवेत आलेल्या व्यक्तीला येथे थांबू नका अशी सुचना केली. त्यानंतरही संशयितानी शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ महिला तुरूंगाधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याच्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.