सांगलीमधे लाचखोरीमध्ये महसूल विभाग अव्वल, वर्षभरात ३८ जणांना अटक
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यात लाच घेत असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना पकडण्यासाठी 27 कारवाया केल्या. यात 38 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच आठ लाख 76 हजार 700 रुपये रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान, महसूल विभाग लाचप्रकरणात अव्वल राहिला आहेमार्च 2020 पासून कोरोनामुळे विविध निर्बंध घालण्यात आले. बहुतेकांना दुकाने, व्यवसाय बंद ठेवावा लागला. विविध कंपन्यांनी नोकर कपात केली. कोरोना महामारीचा विविध घटकांना मोठा फटका बसला. दुसर्या बाजूला प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी मात्र वरकमाई करण्यात व्यस्त होते. विविध कारणाने अगदी राजरोस अडवून पैसे काढण्यात आले.
काम थांबवल्यामुळे आणि लाच मागणीने त्रस्त झालेले सगळेच तक्रारी करत नाहीत. मात्र त्यापैकी काहींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यात 27 प्रकरणात 38 जणांवर कारवाई करण्यात आली. 2015 मध्ये लाचखोरीची पाच प्रकरणे न्यायालयासमोर आली. त्यात एकाला शिक्षा झाली तर अन्य चौघे निर्दोष सुटले. सन 2016 मध्ये एकच प्रकरण न्यायालयासमोर आले. त्यातही संशयित निर्दोष सुटला. सन 2017 मध्ये चार प्रकरणे न्यायालयासमोर आली. त्यापैकी एकाला शिक्षा झाली तर एक जण निर्दोष सुटला. दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली.गेल्या वर्षभरामध्ये वर्ग 1 मधील एक अधिकारी, वर्ग दोनचे 7, वर्ग 3 चे 16 आणि वर्ग 4 मधील एक जणावर कारवाई करण्यात आली. लोकसेवक तिघांवर कारवाई करण्यात आली. नऊ खासगी व्यक्तींच्या वर कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे या कारवाईमध्ये महसूल विभागाच्या सर्वाधिक सहा कारवाया झाल्या. यात नऊ आरोपींना अटक झाली. पोलिस विभागात तीन कारवाया करून चौघांना अटक करण्यात आली. जिल्हा परिषदेतील चार कारवायांत चौघांना अटक करण्यात आली. महापालिका, सहकार, शिक्षण, पाटबंधारे, राज्य उत्पादन शुल्क, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी प्रत्येकी एक कारवाई करून चौघांना अटक करण्यात आली. वनविभागात आणि वीजवितरणमध्ये दोन कारवाया करून पाच जणांना अटक करण्यात आली. तसेच खासगी तीन कारवायांमध्ये पाच जणांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराबाबत लोकांमध्ये जागृती वाढते आहे. त्यामुळे पैसे घेऊन अडकण्यापेक्षा काही अधिकारी सोने किंवा किंमती वस्तूंची मागणी संबंधितांकडून करीत आहेत. सोन्यामध्येसुद्धा दागिन्यांऐवजी वेढणास पसंती दिली जाते. त्यामुळे अशा प्रकरणात संबंधितांवर कारवाई करणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास मर्यादा येत असल्याचे स्पष्ट होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे म्हणाले, भ्रष्टाचारासंबंधी माहिती मिळाल्यास किंवा कोणत्याही कामासाठी लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.