पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना सापडला जाळ्यात
सिन्नर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता गौरव सूर्यकांत गवळी यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अभियंता गौरव सूर्यकांत गवळी याच्यावर ही कारवाई शुक्रवारी (दि. ७) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास अटक केली.
सिन्नर तालुक्यातील कासारवाडी ग्रामपंचायतअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी आर. ओ. प्लांट बसवण्याचे कंत्राट घेऊन सदरचे काम पूर्ण केले होते. सदर कामाची मोजमाप पुस्तिका भरून केलेल्या कामाचे देयक (बिल) काढून देण्यासाठी मदत करण्यासाठी कनिष्ठ अभियंता गवळी यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पंधरा हजारांपैकी पहिला टप्पा १० हजार रुपयांची लाच स्विकारताना गवळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सापळा पथकातील पोलिस हवालदार सुखदेव मुरकुटे, पोलिस नाईक अजय गरुड, परशुराम जाधव आदींनी सापळा रचून कामगिरी यशस्वी केली.दरम्यान, लाचखोर कनिष्ठ अभियंता गवळी यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन अधिकाऱ्यांसाठी लाच स्वीकारल्याचे सांगितल्याचे समजते. त्यामुळे सिन्नर पंचायत समितीसह नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई फिरली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.