आंबा घाटातील दरीतून कार चालकाचा मृतदेह वर काढला

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात स्विफ्ट कार सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली. या कारमधून चालकाचा मृतदेह वर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसासह राजू काकडे अकादमीने यासाठी अथक मेहनत घेतली. संजय गणेश जोशी (वय ६३, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत कारचालकाचे नाव आहे.

देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संजय जोशी हे स्विफ्ट कार ( क्रमांक, एमएच ०९- डी – १०९९) घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यांची कार आंबा घाटातील विसावा पॉइंटनजीक आली असता घाटाचा कठडा तोडून सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली.

यानंतर या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याच्या अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. संजय जोशी यांचा मृतदेह आणि कार घाटातून वर काढण्यासाठी पोलिसासह राजू काकडे अकादमीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.रेस्क्यूवेळी देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भुजबळ, संदीप जाधव, हेमा गोतवडे, अपर्णा दुधाने, राहुल गायकवाड, किशोर जोयशी, वाहतूक शाखेचे एपीआय अमरसिंग पाटील व टीम आदी कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते.

अथक प्रयत्नानंतर गुरूवारी सायंकाळच्या सुमारास संजय यांचा मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात पोलिसांना यश आले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला होता. यानंतर रात्री उशिराने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताचा अधिक तपास साखरपा पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *