खेळ कर्णधारपदाच्या खुर्चीचा…
भारताने द. आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्याच्या धक्का भारतीय क्रिकेटरसिक पचवत असतानाच दुसरा धक्का मिळाला तो विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा. एखादी मालिका गमावल्याची खंत अथवा नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा नव्हता. कारण कोहलीने स्पष्ट केले आहे की, मालिका जिंकली असती तरी त्याचा निर्णय ठरलेला होता. गेल्या चार महिन्यांत कोहलीने चार संघांचे कर्णधारपद सोडले.
20 सप्टेंबरला रॉयल चॅलेंजर्सच्या संघाचे कर्णधारपद सर्वप्रथम त्याने सोडले. त्यांनतर टी-ट्वेंटीचे कर्णधारपद सोडले. मग 8 डिसेंबरला त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आणि या सगळ्याची सांगता 15 जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडून झाली. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला ही कर्णधारपदाची अशी अचानक विरक्ती का यावी? की या निर्णयामागे क्रिकेट सोडून इतर काही घटक आहेत?
या सर्वांचे मूळ हे बीसीसीआय अध्यक्ष, निवड समितीचे अध्यक्ष आणि कोहली यांच्यातील विसंवाद किंवा संवादाच्या अभावामागे आहे हे सहज दिसून येते. विराट कोहलीने जेव्हा टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला तेव्हा हा निर्णय कळवायला त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला. कोहलीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती मंडळातर्फे केली होती, या बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीच्या दाव्याला विराट कोहलीने भर पत्रकार परिषदेत असे काही झालेच नाही म्हणत खोडून काढले. यावर पुन्हा निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांनी बीसीसीआयने अशी विनंती केली होती याचे निवेदन दिले.वास्तविक आजच्या आधुनिक जगात डेटा या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व असताना यापैकी कोहली, गांगुली किंवा चेतन शर्मा यापैकी कुणीच कॉल रेकॉर्डस्च्या दाव्यासकट आपले विधान केलेले नाही. हा घोळ चालू असतानाच बीसीसीआयने प्रसारमाध्यमांना निवेदनात दोन ओळींच्या टीपमार्फत विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माच्या नियुक्तीची बातमी दिली. स्वतः विराटने त्याच 19 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत निवड समितीने हा निर्णय त्याला संघ निवडीच्या फक्त दीड तास आधी कळवला हे संगितले.
आता प्रश्न पडतो की उठसूट पत्रकार परिषदा आयोजित करणार्या किंवा निवेदनांचा रतीब घालणार्या बीसीसीआयला इतका मोठा निर्णय पत्रकार परिषद घेऊन कळवावेसे का वाटले नाही? की विराट कोहलीच्या टी-ट्वेंटी कर्णधारपद सोडायच्या निर्णय प्रक्रियेचे हे गांगुली स्टाईल उत्तर होते? वास्तविक जेव्हा कर्णधार आपले कर्णधारपद सोडतो तेव्हा सर्वप्रथम तो बीसीसीआय अध्यक्ष, मग कार्यवाह आणि त्यानंतर निवड समिती अध्यक्षांना कळवून सोडणे अपेक्षित आहे. या क्रमाला फाटा कोहलीने टी-ट्वेंटी कर्णधारपद सोडताना आणि बीसीसीआयने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढताना दिला. कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत गांगुलीला पुन्हा ती संधीच मिळू नये अशा पद्धतीने कोहलीने हे पद सोडले असे म्हणावे लागेल.
कोहलीने तिसरा कसोटी सामना हरल्यावर प्रथम तासभर द्रविडशी ड्रेसिंग रूमबाहेर चर्चा केली. त्यानंतर आपल्या सहकार्यांना हा निर्णय सांगितला आणि मग बीसीसीआयचे कार्यवाह जय शहा यांना तो कळवला आणि सोशल मीडियाचा मार्ग वापरून जगाला कळवला. गांगुली आणि चेतन शर्मा यांना वैयक्तिकरीत्या कळवायची तसदी त्याने घेतली नाही. या सगळ्या गदारोळात नुकसान होत आहे ते भारतीय क्रिकेटचे. भारताच्या सलामीच्या जोडीची शाश्वती नाही. रोहित शर्मा, गिल, मयांक अग्रवाल, के. एल. राहुल यापैकी जे फिट असतील ते सलामीला येतात. मधल्या फळीत पुजारा आणि रहाणेचे संघातील स्थानच धोक्यात आले आहे. श्रेयस अय्यर, विहारी कसोटीला नवीन आहेत, पंत बेभरवशाचा आहे.
तेव्हा एक फलंदाज म्हणून विराट कोहलीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि संघातील स्थान अबाधित आहे. एक यशस्वी कर्णधार आणि गेल्या एक-दोन वर्षातील फॉर्म सोडता उत्तम फलंदाजी अशी दुहेरी भूमिका बजावणार्या कोहलीने कर्णधारपदाचा हा गुगली बीसीसीआयपुढे टाकला आहे. आत्ताच्या बातम्यांनुसार रोहित शर्माच्या गळ्यात ही माळ पडेल असे दिसते. पण पांढर्या चेंडूच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा आणि लाल चेंडूसाठी वेगळा असावा ही विचारधारा पूर्णपणे अमलात यायच्या आतच आपण त्याला फाटा देणार आहोत.
गेल्या काही मोसमांतील रोहित शर्माचा फिटनेस पाहता हा अतिरिक्त कामाचा दवाब झेपेल ही शंकाच आहे. कर्णधार म्हणून राहुल अजून परिपक्व नाही. पुजारा, रहाणेचा विचार होऊ शकत नाही. अश्विनचे आतबाहेर चालू असते तर बुमराह आणि शमी यांच्यात कर्णधारपदाचा आवाका नाही. थोडक्यात उरतो तो रोहित शर्माच.
कर्णधार बदलाबदलीचा निवड समितीचा हा जुना आवडता खेळ गेल्या चार महिन्यांत पुन्हा दिसला.1982-85 दरम्यानची गावस्कर-कपिलची कर्णधारपदाची अदलाबदल किंवा 1992 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात अझरुद्दीनच्या कर्णधारपदात श्रीकांत, वेंगसरकर, कपिल आणि शास्त्री अशा दिग्गज माजी कर्णधारांना खेळवायचा पराक्रमही आपण केला आहे.
कोहलीने हा काटेरी मुकुट इतकी वर्षे सहज सांभाळला यात त्याच्या अद्वितीय फिटनेसचा खूप मोठा वाटा आहे. रोहित शर्मा या एप्रिलमध्ये 35 वर्षाचा होईल तेव्हा त्याची तिन्ही संघ सांभाळायची इच्छा आणि फिटनेस टिकून राहिले तर उत्तम. नाहीतर कोहलीच्या या निर्णयाने कर्णधारपदाच्या संगीत खुर्चीचा खेळ पुढच्या काही वर्षांत संक्रमणकाळातून जाणार्या भारतीय संघासाठी अटळ आहे.