मुलांना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३ हिमनद्या ओलांडल्या

हातात लसीची पेटी.. अवतीभवती फक्त बर्फ आणि बर्फ… तासंतास पायी चालल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांची (Health Department Teams) टीम बडग्रानला पोहोचली खरी. पण आश्चर्य म्हणजे किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस देण्यासाठी अत्यंत कठोर परिस्थितीत या टीमला तीन हिमनद्याही पार कराव्या लागल्या. (40 Kilometer Cross Glaciers For Vaccination Of Children) वाचा सविस्तर..भरमौरचे आरोग्य अधिकारी डॉ. अंकित मंडला यांनी सांगितले की, भरमौर ते बडग्रानकडे जाणारे हे आरोग्य पथक 40 किमी बर्फात चालत प्रवास करीत आहे. भरमौरमधून बाहेर पडलेला आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू तीन दिवसांपासून बडग्रानमध्ये अडकला आहे. भरमौरहून सकाळी निघालेली टीम संध्याकाळी उशिरा बडग्रानला पोहोचली. शाळेला सुटी असल्याने या दिवसांत मुले घरीच असल्याने या पथकाने गावकऱ्यांना लसीकरणासाठी मुलांना एकाच ठिकाणी आणण्यास सांगितले. यानंतर शाळेजवळील गावातील मुलांना लसीकरण करण्यात आले, या लसीकरणा दरम्यान दुर्गम भागातील मुलांना बोलावले जात आहे. यामुळे हा चमू सध्या तेथेच थांबला आहे. आरोग्य कर्मचारी दिलीप कुमार आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांकडे लसीकरण करण्यासाठी गेले आहेत.भरमौर ते बडग्रान या आदिवासी भागातून 40 किमी बर्फात प्रवास केल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने किशोरवयीन मुलांचे लसीकरण केले. लसीकरणासाठी प्रवास करताना एक सदस्य बर्फात घसरला तर दुसरा त्याची काळजी घेत असे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा बर्फाच्छादित हिमनदी ओलांडतानाचा व्हिडिओ आरोग्य विभागाने सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *