दिवसातून किती साखरेचे सेवन योग्य?

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात साखरेच्या सेवनावर गदा येते. मात्र, ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. साखरेचे अधिक प्रमाणही योग्य नसते तसेच कमी प्रमाणही योग्य नसते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार पुरुषांसाठी प्रत्येक दिवसाचे साखर सेवनाचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त असते. या अहवालानुसार महिलांसाठी दिवसाला जास्तीत जास्त साखर सेवनाचे प्रमाण 25 ग्रॅम आहे तर पुरुषांसाठी हेच प्रमाण 30 ग्रॅम आहे.
साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे हे केवळ मधुमेहामध्येच नव्हे तर अन्यही अनेक बाबतीत योग्य ठरत असते. आहारात जास्त प्रमाण गोड असेल तर आधी वजन वाढते व त्यापाठोपाठ मधुमेह तसेच अन्य आजारांना आवतण मिळते. अर्थात शरीराला गोड न मिळाल्यानेही अपाय होऊ शकतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्याच गोड असलेल्या काही घटकांचा आहारात वापर केला पाहिजे. त्यामध्ये विविध गोड फळे व सुक्या मेवाचा समावेश आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या ग्लुकोजची पूर्तता होते. ते शरीराच्या ऊर्जेसाठी तसेच स्नायूंच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.