कोल्हापूरचा पार्थ देसाई बनला ‘यिन’ मुख्यमंत्री

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (yin) मुख्यमंत्रिपदी कोल्हापूरचा पार्थ देसाई, तर उपमुख्यमंत्रिपद बारामती येथील अल्लाउद्दीन बेग हे निवडून आले आहेत. ‘यिन’ मंत्रिमंडळात सभापतीपदी चंद्रपूरची गायत्री उरकूडे (चंद्रपूर) आणि विरोधी पक्षनेतेपदी मुंबईतील समृद्धी ठाकरे यांची निवड झाली आहे. लेखी व तोंडी परीक्षेची उमेदवारांकडून होणारी तयारी, उमेदवारांची कसोटी पाहणारे परीक्षकांचे प्रश्न, क्षणोक्षणी उमेदवारांची वाढणारी धाकधूक आणि निकालानंतरचा ‘जय महाराष्ट्र’, ‘हिप हिप हूर्रे…’चा जल्लोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही निवड प्रक्रिया(selection process) पार पडली.‘यिन’च्या वतीने राज्यस्तरीय निवडणूक नुकतीच झाली. यात राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यामधून लेखी परीक्षा, मुलाखत आणि वक्तृत्व कौशल्य या कसोट्यांवर आधारित निवड प्रक्रियेमध्ये एकेक टप्पा पार करत पहिल्या फेरीत सर्वोत्कृष्ट आठ, दुसऱ्या फेरीत सर्वोत्कृष्ट चार उमेदवार निवडले गेले. आणि त्यांच्या अंतिम मुलाखतीतून मुख्यमंत्रिपदाचे दोन दावेदार आणि त्यांना झालेल्या मतदानाद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवड झाली. यावेळी ‘यिन’चे सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते. सर्व उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, ‘यिन’चे संपादक संदीप काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यिन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. निवड प्रक्रियेसाठी परीक्षक म्हणून मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते भिमेश मुतुला, नांदेड येथील प्राध्यापक गजानन मोरे यांनी काम पाहिले.पवार म्हणाले, ‘‘तरुणांचे संघटन, चळवळ म्हणून ‘यिन’ हे व्यासपीठ आहे. यात सहभागी झालेला प्रत्येक तरुण हा स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून पुढे आला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची वणवा आहे. हेच नेतृत्व या माध्यमातून निर्माण होणार आहे, त्यामुळे तरुणांनी या व्यासपीठाकडे एक संधी म्हणून पहावे. अपेक्षा पूर्ण करताना आपल्याला आनंद मिळत आहे का? तसेच आपण दुसऱ्याच्या मनात आनंद फुलवत आहोत का?, याचाही विचार तरुणांनी करायला हवा. तुमच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘यिन’चा उपयोग करा.’’ डॉ. जोगदंड म्हणाले,‘‘प्रभावी संवाद कौशल्य विकसित करा, इंग्रजी भाषा आत्मसात करा, माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान ठेवा, आत्मविश्वास बाळगा आणि प्रचंड मेहनत करा, ही पंचसूत्री वापरल्यास नक्कीच यश मिळेल.’’ सूत्रसंचालन काळे यांनी केले.

यिनचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. यानिमित्ताने राज्यातील युवकांसाठी काम करण्याचा मानस आहे. लवकरच महाराष्ट्र दौरा करून तरुणांचे प्रश्न समजावून घेणार आहे.

– पार्थ देसाई, (यिन, मुख्यमंत्री)

जास्तीत-जास्त युवकांना एकत्रित करून ‘यिन’शी जोडण्यासाठी योगदान देणार आहे. खेड्या-पाड्यात जाऊन तरुणांविषयक वेगवेगळे उपक्रम पोचविणे, तेथील तरुणांचे प्रश्न समजून घेणे, यावर लक्षकेंद्रीत करणार आहे.

– अल्लाउद्दीन बेग, (यिन, उपमुख्यमंत्री)

एकमेकांशी संवाद साधत प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे. तरुणांचे प्रश्न समजून घेते, त्याला योग्य न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यानिमित्ताने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची संधी मिळेल.

– समृद्धी ठाकरे, (यिन, विरोधी पक्षनेते)

तरुणांचे प्रश्न समजून घेऊन, ते सोडविण्यासाठी काम करणार आहे. ‘यिन’च्या माध्यमातून विविध उपक्रम अधिकाधिक तरुणांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करेल.

– गायत्री उरकुडे,

(यिन, सभापती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *