विराट कोहलीच्या निशाण्यावर सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड!
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना पार्ल मैदानावर खेळला जात आहे. कसोटी मालिका गमावलेल्या भारतीय संघाकडून वनडे मालिकेत चांगली कामगिरी अपेक्षित आहे. चला जाणून घेऊया या सामन्यात कोणते मोठे विक्रम होऊ शकतात.
कोहली सचिन तेंडूलकरला मागे टाकेल…
विराट कोहलीने (Virat Kohli) पार्ल एकदिवसीय सामन्यात 9 धावा केल्या तर तो टीम इंडियासाठी भारताबाहेर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. आत्तापर्यंत कोहलीने भारताबाहेर खेळताना 107 सामन्यात 5057 धावा केल्या आहेत. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकर (5065) च्या नावावर आहे.एवढेच नाही तर कोहलीने 27 धावांचा टप्पा गाठला तर आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर (2001) नंतर तो दुसरा भारतीय ठरेल. विराटने आतापर्यंत (1287) धावा केल्या असून तो चौथ्या स्थानावर आहे. सचिननंतर सौरव गांगुली (1313) दुसऱ्या क्रमांकावर आणि राहुल द्रविड (1309) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकावली आहेत. जर कोहलीने द. आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो रिकी पाँटिंगशी (71) बरोबरी साधेल. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे.
चहलला विकेटच्या शतकाची संधी…
युझवेंद्र चहलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 विकेट घेतल्यास तो या फॉरमॅटमध्ये 100 विकेट पूर्ण करेल. टीम इंडियासाठी 100 एकदिवसीय विकेट घेणारा चहल हा 24 वा खेळाडू ठरणार आहे. तसेच, त्याने 3 विकेट घेतल्यास, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज बनेल. चहलने आतापर्यंत 56 एकदिवसीय सामन्यांमध्ये 97 बळी घेतले आहेत. युझवेंद्र चहलने पहिल्या सामन्यात दोनही विकेट घेतल्यास तो आफ्रिकेत वनडेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. चहलच्या नावावर आफ्रिकेत 16 विकेट असून सध्या कुलदीप यादव 17 विकेटच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर आहे.
केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार होणारा भारताचा 26 वा खेळाडू असेल.
जसप्रीत बुमराहचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 150 वा सामना असेल.
या सामन्यात डेव्हिड मिलरने 2 चौकार मारले तर तो वनडेत 250 चौकार पूर्ण करेल.
शिखर धवन (2488) या सामन्यात 12 धावांसह भारताबाहेर 2500 धावा पूर्ण करेल.