पाडापाडीचे राजकारण पुढे झेपणार का?

(political news) जिल्ह्याच्या राजकारणात सगळ्यांनी मिळून एकत्र जाऊया. विरोधाचा सूर उमटायला नको म्हणून आपण एक भूमिका घेतली. त्याला सार्‍यांनी पाठिंबा दिला आणि पॅनेलमध्ये घेऊन पाडापाडी केली. हे अविश्‍वासाचे आणि पाडापाडीचे राजकारण जिल्ह्याच्या राजकारणात झेपणार आहे का? असा रोकडा सवाल जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी केला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी बोलविलेल्या सत्तारूढ आघाडीच्या संचालकांच्या बैठकीत बोलताना विनय कोरे यांनी प्रक्रिया गट आणि पतसंस्था गटातील सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवाचा पंचनामा करताना प्रत्येक नेत्याच्या मतदारसंघात सत्ताधारी आघाडीतील उमेदवाराला किती मते पडली आणि विरोधी आघाडीतील उमेदवारांना किती मते पडले याचा आकडेवारीसह पंचनामा केला.

आमदार विनय कोरे म्हणाले की, सगळ्यांनी एकोप्याने जाऊया ही भूमिका बैठकीत घेतल्यानंतर सगळ्यांनी त्याला सहमती दिली. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकदा हे ठरल्यानंतर आघाडींतर्गत पाडापाडी कशी होते. ठराविक उमेदवार निवडून पाडले जातात आणि आपल्या हवे ते उमेदवार सत्तारूढ आघाडीचे नेते मते देऊन निवडून आणतात हा विश्‍वासघात कशासाठी? जर तुम्हाला हे मान्य नव्हते तर आघाडीच्या बैठकीतच सांगायचे होते. हे उमेदवार आम्हाला मान्य नाहीत. त्याचवेळी आपण वेगळा विचार केला असता; पण आघाडीत घ्यायचं आणि पराभूत करायचं हा कुठला आघाडी धर्म, अशा संतप्‍त भावना कोरे यांनी व्यक्‍त केल्या.

सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराला मते पडतात आणि दोनच गटांतील उमेदवारांना ही मतं पडत नाहीत. तीन तीन हजारांचा फरक कसा पडतो? हे ठरविल्याशिवाय होतेय का? असा सवाल करीत कोरे म्हणाले की, तुम्हाला हेच करायचे होते तर प्रामाणिकपणे सांगायचे होते. आघाडीत एक ठरवायचं आणि प्रत्यक्षात दुसरं करायचं. हेच करायचं असेल तर पुढच्या राजकारणात गृहीत धरू नका हे यापूर्वीच सांगितलं आहे. असला पाडापाडीचा आणि विश्‍वासघाताचा प्रकार पुढच्या राजकारणात तुम्हाला झेपणार आहे का? असा सवालही त्यांनी केला. (political news)

कोरे यांच्या रुद्रावतारामुळे बैठकीत काही काळ सन्‍नाटा पसरला. काहींनी आपली चूक झाल्याचे मान्य केले. काहींनी तर आपल्या तालुक्यातील कोरे यांनी वाचून दाखवलेली आकडेवारी मान्य करीत असे प्रकार पुन्हा होणार नाहीत अशी आश्‍वासक भूमिका घेतली तर काहींनी मूक संमती दिली. या सार्‍या चर्चेनंतर विनय कोरे सत्ताधारी आघाडीची बैठक अर्धवट टाकून निघून गेले.

मुश्रीफांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न

आ. कोरे सत्ताधारी आघाडीची बैठक अर्धवट सोडून निघून गेल्यानंतर याची सारवासारव करताना मंत्री मुश्रीफ यांनी कोरे यांनी आपल्या भावनांना मुक्‍तपणे वाट करून दिली. ते काही कामासाठी बाहेर गेले आहेत. ते माझे अध्यक्षपदासाठी सूचक आहेत आणि ते जिल्हा बँकेत माझे नाव सुचविण्यासाठी येतील, असे सांगत बैठकीत तापलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *