पशुखाद्य दरामध्ये वाढ; दूध उत्पादक चिंताग्रस्त
सध्या पशुखाद्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. सरकी पेंडेचे दर तर आकाशाला गवसणी घालत आहेत. ज्वारी, मका, सोयाबीनचे दर वाढल्याने पशुखाद्य निर्मिती करणार्या कंपन्यांनी गोळी, पेंडींचा दर दुप्पट वाढवले आहेत. तुलनेत दुधाच्या दरात वाढ न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पशुखाद्याच्या वाढत्या दरवाढीमुळे दूध उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
गेल्या 5 वर्षांपासून दूध दरवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. गाईच्या व म्हशीच्या दुधाला फॅटनुसार मिळणारा दर वाढलेला नाही. अनेकदा मागणी आणि आंदोलने करूनही दूध दरवाढ देण्यात शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. दोन वर्षापासून अवकाळी पावसाने धान्य उत्पादन घटल्याने सरकी, गोळीपेंडीचे दर वाढले आहेत.शेतामध्ये चार उत्पादन घेऊन पशुपालन केल्यावरही तोट्याचे बनत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 20 वाड्याच्या पेंडीस 100 रुपये तर कडब्याचा एका पेंडीला 25 रुपये द्यावे लागतात. 10 लिटर दूध देणार्या गायीला सरासरी 30 किलो ओला, सुका चारा आणि पशुखाद्य द्यावे लागते. त्याचे मूल्य 220 रुपये होते. दूध उत्पादनातून 10 लिटरला सरासरी 250 रुपये मिळतात. शिल्लक राहणार्या 30 रुपयातून मजुरी, विद्युत बिल, बँकेचा हप्ता अशक्य बनत आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे.