कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ 2021-22 साठी ‘कोल्हापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. विद्यापीठाने या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. या पुरस्काराने (award) कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
जिल्हा ते केंद्रीय स्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता व हरितपणा या निकषांवर निवड केली जाते. पुरस्काराच्या निकषांत जलव्यवस्थापन, सौरऊर्जा वापर व ऊर्जा संवर्धन उपक्रम, हरितक्षेत्र व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि भू-वापर व व्यवस्थापन यांचा समावेश होता.
गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार मिळवला आहे. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. डब्ल्यू. जी. प्रसन्न कुमार यांनी विद्यापीठ प्रशासनास दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत राबवलेल्या जलव्यवस्थापन अभियानामुळे परिसर पाणी वापरात स्वयंपूर्ण झाला आहे. विद्यापीठ साधारण 31 कोटी लिटर पाण्याचे संवर्धन करते. दररोज 4 लाख लिटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते उद्यानांसाठी वापरले जाते. सध्या वीज वापरापैकी 16 टक्के वीज सौरऊर्जेपासून मिळवली जाते. विद्यापीठाने 853 एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड केली आहे. विद्यापीठ परिसरात विविध प्रजातींची 13 हजारांहून अधिक वृक्ष आहेत. हा परिसर कोल्हापूरचे फुप्फुस म्हणून ओळखला जातो.
मियावाकी जंगल क्षेत्र विकसित करण्याचा प्रकल्प विद्यापीठ राबवत आहे. नव्या तंत्राचा वापर केल्याने विद्यापीठाला यश (award) मिळाल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले.
‘ग्रीन प्रॅक्टिसेस’मध्ये सर्वच घटकांचे योगदान मोलाचे : कुलगुरू
शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनासह पर्यावरणपूरक संवर्धनशील हरित विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. यात अभियांत्रिकी व उद्यान विभाग देत असलेले योगदान लक्षणीय आहे. सर्वांमुळेच विद्यापीठ परिसराची हिरवाई व प्रेक्षणीयता अबाधित आहे. पुढील काळात असेच काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी सांगितले.