हीच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत येणार्या महापुरावरील तत्काळ उपाययोजना
कृष्णा खोर्यातील धरणांतील पाणी सोडण्याचे नियोजन केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (guidelines) करणे हीच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत दरवर्षी येणार्या महापुरावरील तत्काळ उपाययोजना आहे, असा निकर्ष सांगली, कोल्हापूर महापूर कृती समितीने शिवाजी विद्यापीठास सादर केलेल्या अहवालातून निघाला आहे. विद्यापीठातील हवामान बदल व शाश्वत विकास केंद्र आता महापुराचा अभ्यास करणार आहे.
कोल्हापूर, सांगलीमध्ये 2005, 2006, 2019 व 2021 मध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडणे, राजापूर बंधार्याच्या खाली कृष्णा नदीस कमी असलेला नैसर्गिक उतार, अलमट्टी धरणातून अनियमित साठा व विसर्ग सोडणे, कृष्णा नदी प्रवाहास होणारे मानवनिर्मित अडथळे व इतर काही कारणांमुळे कृष्णा नदीस महापूर येऊन गेले. आतापर्यंत आलेल्या महापुरांची कारणे एकसारखी आहेत. 31 मे 2021 रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर, सांगली, सातार्याचे जिल्हाधिकारी, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता व इतर लोकप्रतिनिधी यांची पूरनियंत्रणासदर्भात बैठक घेतली.
बैठकीत 31 ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणात 51 हजार 700 मीटरपर्यंत पाणीपातळी ठेवून राजापूर बंधार्यातून जेवढा विसर्ग खाली जाईल, त्यापेक्षा जादा विसर्ग अलमट्टी धरणातून खाली करावा असे ठरले.परंतु; प्रत्यक्षात अलमट्टी धरणात 29 जुलै 2029 रोजी पाणीपातळी 597.80 मीटर ठेवून खाली विसर्ग कमी सोडण्यात येत होता.
त्यामुळे राजाराम बंधारा, आयर्विन पूल येथील पाणीपातळी बदलत राहिली. पूर नियंत्रणात येत नाही असे वाटू लागल्यानंतर राज्य सरकारच्या प्रयत्नानुसार अलमट्टीतून हळूहळू विसर्ग वाढवून तो 3 लाख 50 हजार क्युसेक्सपर्यंत केल्यानंतर पूर नियंत्रणात आला. तोपर्यंत कोल्हापूर, सांगलीतील पाणी उतरण्यास 10 ते 12 दिवस लागले, ही वस्तुस्थिती आहे.
महापुरासंदर्भात सांगली, कोल्हापूर पूर नियंत्रणासाठी कृती समिती स्थापन झाली आहे. यात जलअभियंता, पर्यावरण, पाणी विषयावर काम करणारे, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपासून ग्रामपंचायत व शहर स्तरावर बैठका सुरू आहेत.
समितीने कृष्णा नदी महापुरासंदर्भात कोयनानगर धरण ते अलमट्टीपर्यंतच्या धरणातून पाणी सोडण्याचा तांत्रिक अभ्यास केला. यात केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नुकताच समितीने कृष्णा नदी महापुराचा अहवाल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांना सादर केला आहे.
नदीला महापूर येण्याची कारणे…
नदी व नदीला मिळणार्या उपनद्या, नाले, ओढे यांच्यावरील अतिक्रमणे, नदीवरील बांधकामे पूल, ओढे, कॉजवे यांचे जलशास्त्रीय दृष्टिकोनातून बांधकाम न होणे. जागतिक तापमान वाढीमुळे अनियमित व अतिवृष्टी होणे यांचा अचूक अंदाज न येणे. केंद्रीय जलआयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार धरण साठा न करणे, राजापूर बंधारा ते अलमट्टी धरणापर्यंत नदीचा नैसर्गिक उतार अत्यंत कमी असणे ही महापुराची कारणे आहेत.
तत्काळ व दीर्घकालीन उपाय योजना..
केंद्र सरकार केंद्रीय जल आयोगाच्या जानेवारी 2018 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (guidelines) धरणातील पाणी साठ्याबाबत काटेकोर पालन करावे, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत पूरनियंत्रणाबाबत केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार समन्वय ठेवावा. अलमट्टी धरणाची पाणी पातळी 1 सप्टेंबरपर्यंत 596.00 मीटरपेक्षा जास्त ठेवू नये.
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी पूर संरक्षक समिती स्थापन करण्यात यावी, अशा तत्काळ उपाययोजना अहवालात सुचविल्या आहेत. त्यामध्ये कृष्णा पाणी वाटप लवादाच्या मान्यतेनंतर कृष्णा नदी पुराचे पाणी इतर खोर्यांत बोगद्यांद्वारेे वळविणे, केंद्र शासन स्तरावरून नद्या जोड प्रकल्प राबविणे, कृष्णा खोर्यातील सर्व धरणांतून एकात्मिक पद्धतीने विसर्ग करणे आवश्यक आहे.
कृष्णा खोर्यातील सर्व जलाशयांतील पाणी सोडण्याचे आराखडे मान्सून कालावधीत सुधारित करावेत. पूर देखरेख कक्षात निष्णात जल वैज्ञानिकाची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी. मुख्य नदीच्या लांबीतील सर्व भागांत पूररेषा पातळी आखावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवून कार्यपालन आराखडा व ‘एसओपी’ तयार करावी आदी शिफारसी कृष्णा नदीचा महापूर रोखण्यासाठी कृती समितीने विद्यापीठास दिलेल्या अहवालात केल्या आहेत.
जल आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे…
31 जुलै रोजी धरणात पाणीसाठा धरण क्षमतेच्या 50 टक्के असावा.
31 ऑगस्ट रोजी धरणात पाणीसाठा धरण क्षमतेच्या 77 टक्के असावा.
15 सप्टेंबर रोजी धरणात पाणीसाठा धरण क्षमतेच्या 100 टक्के असावा.