झारीतील शुक्राचार्यांमुळे कोल्हापूर पोलिस दलाची प्रतिमा डागाळतेय!
मटकाकिंग सावला टोळीला बेड्या ठोकून महाराष्ट्रासह सात राज्यांतून मटका हद्दपार करत लौकिक मिळविलेल्या कोल्हापूर पोलिसांच्या (police) नाकावर टिच्चून जिल्ह्यात मटका रॅकेट पुन्हा ओपन झाले आहे. ‘कलेक्शन’वाल्या पोलिसांच्या उचापतींमुळे मटका, जुगारातील साखळी सुसाट झाली आहे. विनासायास कमाईला सोकावलेल्या ‘वर्दी’तल्या काही लाचखोरांमुळे अख्ख्या कोल्हापूर पोलिस दलाची प्रतिमा डागाळू लागली आहे.
काळे धंदेवाल्यांचे साम्राज्य
दीड वर्षात काळ्या धंद्यांमधील उलाढाली थंडावल्या असताना कोरोना ‘अनलॉक’नंतर मात्र या व्यावसायिकांना जिल्ह्यात खुलेआम परवाना मिळाला की काय, अशी स्थिती आहे. अप्पर पोलिस अधीक्षक आणि शहर पोलिस उपअधीक्षक अशी दोन महत्त्वाची पदे असतानाही इचलकरंजीसह परिसरात काळ्या धंदेवाल्यांनी साम्राज्य निर्माण केले आहे.
कुरुंदवाडमधल्या ‘जेपी’ या टोपण नावाने परिचित असलेल्या मटकाबुकीने शिरोळसह हातकणंगले तालुक्याला विळखा घातला आहे. ‘कलेक्शन’वाल्यांची सतत त्याच्या भोवताली होणारी गर्दी वरिष्ठांच्या नजरेला येत नाही का?
कोण हे कारभारी?
मुंबईतील मटकाकिंग कोल्हापुरात ‘मोका’ कारवाईत जेरबंद झाल्याने जिल्ह्यातील उलाढाल थंडावली होती. मात्र, लॉकडाऊन आणि ‘अनलॉक’नंतरच्या काळात मटका अड्ड्यांसह जुगारी क्लब, तस्करी जोमाने सुरू झाली आहे. रॅकेटला सिग्नल देणारे कारभारी कोण? याचा शोध लावणे गरजेचे आहे. अधिकार्यांशी जवळीकतेचा वापर घेऊन काळ्या धंदेवाल्यांना पडद्याआड सहाय्य करणार्या झारीतील शुक्राचार्यांमुळे कोल्हापूर पोलिस (police) दलाची प्रतिमा डागाळली जात आहे, याचे सार्यांनाच भान असावे.
विशेष पथकांची विशेष कामगिरी?
प्रलंबित गुन्ह्यांसह गुन्हेगारी रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी पोलिस ठाण्यांतर्गत विशेष पथकांची स्थापना करून अधिकार्यांसह पोलिसांची नियुक्ती केली. काही पथकांची कामगिरी डोळ्यांत भरण्यासारखी आहे. मात्र, पथकातील बहुतांशी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रभारी अधिकार्यांचे नियंत्रण आहे काय? हा देखील चर्चेचा विषय बनला आहे.
जिल्ह्यात सर्वत्रच काळेधंदे फोफावले
महाराष्ट्रासह सहा- सात राज्यांत मटका उलाढालीवर वर्चस्व गाजविणार्या सावला टोळीचे कंबरडे मोडून कोल्हापूर पोलिसांनी काळ्या धंदेवाल्यांचे आंतरराज्य रॅकेट अक्षरश: उद्ध्वस्त केले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काळ्याधंद्यांच्या निर्मूनाचा विडा उचलला खरा; पण कोल्हापूर शहर, इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ, करवीर, मुरगूडसह चंदगड परिसरातूनच आदेशाला खोडा घातल्याचे चित्र आहे.