जोतिबाचे खेटे दोन वर्षांनंतर सुरू
‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील खेट्यांना रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. दोन वर्षांपासून कोरोनामुळे डोंगरावर खेटे झालेच नाहीत; पण यंदा प्रशासनाने खेट्यांना परवानगी दिली. त्यामुळे डोंगर आज हाऊसफुल्ल झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातील सुमारे दोन लाख भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली. ‘चांगभल’च्या जयघोषाने डोंगर दणाणून गेला. दरम्यान, भाविकांनी (devotees) निर्बंधाचा आदर करून दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते.
भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीने मंदिर परिसरात दर्शन मंडप उभारला. मोफत ई-पास काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सोशल डिस्टन्सिंगचा आज डोंगरावर फज्जा उडाला. पहिल्या खेट्याच्या निमित्ताने डोंगर भागातील पायवाटा तब्बल दोन वर्षांनंतर गर्दीने फुलून गेल्या. कुशिरे, पोहाळे, दाणेवाडी, गिरोली भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले. पहाटे तीनपासून डोंगरावरवर भाविक येण्यास सुरुवात झाली. आज डोंगरावर मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता. पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी पाहाणी केली. डोंगरावर आज श्वानपथक फिरवले. रात्री भव्य पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल, खोबरे व पुष्पवृष्ठी करण्यासाठी भाविकांची (devotees) गर्दी झाली होती. देवस्थान समितीच्या अधीक्षक दीपक मेहतर, देवसेवक, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.
मुले हरवण्याच्या घटना
डोंगरावर आज गर्दीमुळे लहान मुले हरवण्याच्या घटना दिवसभरात घडल्या. लहान मुलांना शोधताना पोलिस यंत्रणा तसेच नातेवाईकांची दमछाक झाली. आज लहान मुलांना दर्शनासाठी सोडण्यासाठी भाविकांनी यंत्रणेशी हुज्जत घातली.
हुल्लडबाजीस आळा
जोतिबा डोंगरावर खेट्यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात उद्धट वर्तन करून दंगा करतात. त्यांना रोखण्यासाठी शनिवारपासून शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळोखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून त्यांनी हुल्लडबाजीस आळा घातला. सर्रास भाविकांना ‘श्रीं’चे दर्शन झाल्याने समाधान व्यक्त होत होते.