जयसिंगपूर : स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची आदित्य ठाकरेंकडे मागणी
(local news) शिवसेनेच्या वतीने सन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या वचननाम्याची तातडीने पुर्तता करा, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना पक्षाच्या वतीने जनतेला विधानसभा २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत वचननामा दिलेला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने वचननाम्यामध्ये विविध योजनेचा उल्लेख केला आहे.
युवा सरकार फेलो अर्थात राज्यातील १५ लाख पदवीधर युवकांना शिष्यवृत्ती संधी दिली जाईल. तसेच तालुका व जिल्हास्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५०० विशेष बसची सेवा सुरू केली जाईल. यासह अनेक योजनेची माहिती विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये करण्यात आलेली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत चाललेली आहे. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, शेतमजूर, लहान उद्योजक, व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः कोलमोडली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था तर अतिशय वाईट आहे. त्यांना शैक्षणिक फी भरणे देखील अवघड झालेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे येताना बसची सोय नसल्याने चालत यावे लागते. शाळा तिथे बस ही योजना ग्रामीण भागात लागू पडताना दिसत नाही. पदवीधर युवकांच्या हाताला रोजगार नाही. नोकरी तर दूरची गोष्ट आहे. आपण आपल्या वचननाम्यामध्ये पदवीधर युवकांना शिष्यवृत्ती देणार असल्याचे नमूद केले होते. मात्र अद्यापही याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या आशेने राज्यातील विद्यार्थी आपल्या महाविकासआघाडी सरकारकडे पाहतो आहे. (local news)
शैक्षणिक कारकिर्दीला चालना देण्यासाठी आपल्या वचननाम्यामध्ये जी वचने दिलेली आहेत, त्या वचनांची पुर्तता करावी, जेणेकरून या गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आम्ही सर्व स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याकडे ही मागणी घेऊन आलो आहोत. विद्यार्थ्यांच्या न्याय प्रश्नांकडे तातडीने लक्ष घालून आपण निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.