शिरोळ तालुक्यासाठी चिंताजनक ठरत आहे ‘ही’ बाब
जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा (pollution) प्रश्न आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. नदी प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. शिरोळकरांना पंचगंगा नदी प्रदूषणामुळे आजाराचा विळखा पडत आहे. शासनाने आता तरी पंचगंगा नदी प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर, इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरांचे सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींतील रासायनिक सांडपाणी पंचगंगेत मिसळते. पाणी दूषित होऊन याचा फटका नागरिकांना बसतो.पंचगंगा नदीकाठावरील गावांचे सांडपाणीही थेट नदीत मिसळते. पंचगंगा बचाव चळवळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंचगंगा काठावरील ग्रामस्थ सातत्याने आंदोलने करून पंचगंगा नदीचे प्रदूषण (pollution) थांबविण्याची मागणी करीत आहेत.
सांडपाणी प्रकल्प गरजेचे
गेल्या अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीकाठावर असलेल्या अनेक गावांत सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, काही गावांत सांडपाणी प्रकल्प अद्याप उभारलेले नाहीत. शासनाने औद्योगिक वसाहतींसाठी सीईटीपी व गावांच्या सांडपाण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.
दूषित पाण्यामुळे आजारांची भर
दूषित पाण्यामुळे अतिसार, पॅराटायफॉईड, कावीळ, यकृताचे आजार, अन्ननलिकेला धोका, त्वचारोग, डोळ्यांचे आजार यांसह विविध आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहेत. त्याचबरोबर नदीच्या दूषित पाण्यामुळे भाजीपाल्यावरही मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.