कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना नव्याने होणार

राज्य शासनाने (state government) विधिमंडळात मंजूर केलेल्या विधेयकामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेली प्रभाग रचना रद्द झाली आहे. विधेयकाची प्रत महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ही संभ्रमावस्था दूर झाली. परिणामी आता पुन्हा प्रभाग रचना नव्याने होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून हे अधिकार स्वतःकडे घेतल्याने शासनच त्यासंदर्भातील तारखा जाहीर करेल. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्याची प्रभाग रचना रद्द झाल्याने तिसर्‍यांदा कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना रद्द झाली आहे.

विधेयकात असे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम 2022 याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी राज्य निवडणूक आयुक्‍तांनी महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायती यांच्या क्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली असेल किंवा पूर्ण केली असेल तेथे ती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.

संबंधित महानगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या व नगर पंचायतींच्या क्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या उक्‍त अधिनियमांच्या तरतुदींनुसार नव्याने करण्यात येईल.

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आहे. कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परिणामी राज्य शासनाने आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती केली आहे. दरम्यानच्या कालावधीत डिसेंबर 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने एक सदस्य प्रभाग रचना, आरक्षण सोडत जाहीर केली. जानेवारी-फेब—ुवारी 2021 मध्ये मतदार याद्याही अंतिम झाल्या होत्या. तोपर्यंत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

चौथ्यांदा प्रभाग रचना करावी लागणार

राज्य शासनाने (state government) एकसदस्य प्रभाग रचनेऐवजी बहुसदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. एकसदस्य प्रभाग रचना रद्द झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्रिसदस्य प्रभाग रचनेद्वारे रचना करण्याची सूचना केली. त्यानुसार 81 नगरसेवकांसाठी 27 प्रभाग करून प्रभाग रचना करण्यात आली. त्यासंदर्भातील अहवाल 23 नोव्हेंबर 2021 ला पाठविण्यात आला. तोपर्यंत राज्य शासनाने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.

परिणामी पुन्हा प्रभाग रचना बदलण्यात आली. शासन आदेशानुसार कोल्हापूर शहरातील लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 92 झाली. त्यानुसार प्रत्येकी 3 नगरसेवकांसाठी 30 व 2 नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग करण्यात आले. त्यासंदर्भातील प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकतींवर सुनावणीही झाली. आता पुन्हा प्रभाग रचना बदलण्यात येईल. गेल्या दीड वर्षात तब्बल तीनवेळा प्रभाग रचना रद्द झाल्याने प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरल्याचा प्रकार झाला आहे.

आरक्षणही बदलणार…

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेत नगरसेवकांची संख्या 92 होईल. कोल्हापूर शहरातील लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती प्रवर्ग 12, अनुसूचित जमाती प्रवर्ग 1, सर्वसाधारण प्रवर्ग 79 असे आरक्षण होते. परंतु आता नव्याने निवडणूक प्रक्रिया होणार आहे. तसेच ओबीसी आरक्षणासाठी सर्वच राजकीय पक्ष आग्रही आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नयेत, असा पवित्रा राजकीय पक्षांनी घेतला आहे. परिणामी पुन्हा जागांचे आरक्षणही बदलणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *