जापनीज कमांडोंनी जाणून घेतला शिवछत्रपतींचा ‘गनिमी कावा’!

शिवछत्रपतींच्या गनिमी कावा युद्धतंत्राचा अभ्यास करण्यासाठी बेळगाव येथील ‘मराठा’ बटालियनमध्ये आलेल्या जापनीज कमांडोंनी शुक्रवारी न्यू पॅलेसला सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी छत्रपती शहाजी महाराज म्युझियम पाहिले व ट्रस्टचे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्याशी संवाद साधला.
जपान देशाच्या सैन्य दलातील 35 कमांडो बेळगाव येथील मराठा बटालियनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून अभ्यास दौर्‍यासाठी आले आहेत. या अभ्यास प्रशिक्षणाची सांगता शुक्रवारी शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याची दक्षिण राजधानी पन्हाळगडाचे दर्शन आणि न्यू पॅलेसला भेटीने झाली. जापनीज कमांडोंसोबत मराठा बटालियनचे 15 अधिकारी व सैनिकही उपस्थित होते. न्यू पॅलेस आणि संग्रहालय पाहिल्यानंतर सर्व सैनिकांनी दरबार हॉलमध्ये शाहू महाराज यांची भेट घेतली. भेटीची आठवण म्हणून जपानी अधिकार्‍यांनी शाहू महाराज यांना विशेष पदक भेट दिले. यावेळी 109 टी.ए. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुलदीप कुमार, कर्नल सुजय घाग, तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील आदी उपस्थित होते. जपानच्या कमांडोंनी शाहू महाराजांसह न्यू पॅलेसच्या परिसरातील पुतळे व तोफांसोबत आवर्जुन छायाचित्रे टिपली
जपानी सैनिकांच्या भेटीदरम्यान शाहू महाराज यांनी त्यांना न्यू पॅलेसमधील जपानी अधिकार्‍याचा छोटा पुतळा आवर्जुन दाखवला. त्या पुतळ्यावरील इंग्रजी आणि जापनीज भाषेतील त्या अधिकार्‍याचे नावही जपानी अधिकार्‍यांना वाचायला सांगितले. त्या पुतळ्यावर ‘अ‍ॅडमिरल टो गो कमांडर इन चिफ ऑफ जापनीज कंबाइन्ड फ्लिट’ असे लिहिले आहे. हा पुतळा पाहून सैनिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. यावेळी शाहू महाराज म्हणाले, पहिले महायुद्ध सुरू झाल्याने इंग्लंडमध्ये शिकायला असणारे छत्रपती राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी यांनी (1914) भारतात परतण्याचा निर्णय घेतला. युरोप खंड युद्धभूमी असल्याने त्यांनी अमेरिकामार्गे जपान आणि तेथून भारत असा बोटीने प्रवास केला. या प्रवासादरम्यान, जपान येथे मुक्‍कामाला असताना तेथील सैन्य दलाच्या अधिकार्‍यांनी त्यांना ‘अ‍ॅडमिरल टो गो’ यांचा पुतळा भेट दिला असावा. 1863 ते 1913 अशी सैनिकी कारकिर्द गाजविणारे अ‍ॅडमिरल टो गो यांनी ‘मार्शल अ‍ॅडमिरल’ पदापर्यंत जबाबदारी सांभाळली होती. या अधिकार्‍याचा पुतळा आजही जतन करून ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *